Breaking News

विमानतळासाठी जमिनीचे संपादन : प्रकल्पग्रस्तांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी

पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधात आता सातही गावातील शेतकरी एकवटले. हजारो शेतकर्‍यांनी महाग्रामसभा घेवून कोणत्याही परिस्थितीत आमच्या जमिनी देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रपतींनी इच्छा मरणाची परवानगी द्यावी असा ठराव करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील पारगाव, एखतपूर, खानवडी, मंजवडी, कुंभारवळण, वणपुरी व उदाचीवाडी या 7 गावांच्या परिसरातील सुमारे 6 हजार एकर क्षेत्रावर छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. 


विमानतळाला हव्या असणार्‍या सर्व परवानग्या मिळाल्याने लवकरच जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभुमीवर आज या बाधित सातही गावातील शेतकर्‍यांनी पारगाव येथे एकत्र येवून महाग्रामसभा घेतली. विविध आंदोलने करून, निवेदने देवून देखील शासनाचे डोळे उघडत नाही. मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करणार्‍या धर्मा पाटलांचा मार्गच योग्य असल्याचे म्हणत ग्रामस्थांनी राष्ट्रपतींनी आम्हाला इच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी केली. यावेळी इच्छा मरणाचे अर्ज देखील भरून घेण्यात आले.
पुरंदर तालुक्याची दुष्काळी तालुका ओळख पुसून तालुक्यातील शेतकरी आता फळबागा करू लागले आहेत. या ठिकाणी अंजीर, सीताफळे, डांळीब यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि ही फळे परदेशीही पाठवले जातात. काही परदेशी नागरिक सुद्धा या ठिकाणी जमिनी घेऊन शेती करत आहेत. अशाच डोली पंडोल या देखील विमानतळ बाधित शेत्रात शेती करतात. त्यांनीही विमानतळाला विरोध केला. काही दिवसांपुर्वी याच तालुक्यातील आमदार व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथील शेतकर्‍यांना कोचीन विमानतळाच्या धर्तीवर भागदारक आणि जमीन अधिग्रहण कायद्यानुसार 10 पट जमिनीचा मोबदला या 2 अटी शेतकर्‍यांसमोर ठेवल्या होत्या. पण महाग्रामसभेतील शेतकर्‍यांचा पवित्र पाहता प्रस्तावित विमानतळासाठी जमीन संपादित करणे अवघड होणार आहे. हे शेतकरी 15 दिवसांमध्ये पुण्यात मोर्चा घेऊन जाणार आहेत. खेडमधील शेतकर्‍यांचा वाढलेल्या विरोधामुळे पुरंदरला विमानतळ हलवण्यात आले. मात्र स्थानिकांचा होणारा सततचा विरोध पाहता पुरंदरमधील विमानतळाचे उड्डाण पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.