Breaking News

निगडीत दोन दिवस सूर, ताल व वाद्यांचा होणार संगम

पुणे : ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र यंदाचे वर्ष ’संगीत वर्ष’ म्हणून साजरे करीत आहे. विद्यार्थ्यांसह अध्यापकांना देखील संगीताचे धडे मिळावे तसेच संगीत परंपरा जोपासून ती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशातून ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रामार्फत शिक्षण क्षेत्रातील पहिलेच दोन दिवसीय संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये संगीत दिंडी, मार्गदर्शन, प रिसंवाद, कार्यशाळा अशी विविध सत्रे होणार आहेत. 


बुधवार (दि. 21) आणि गुरुवार (दि. 22) रोजी हे दोन दिवसीय संगीत संमेलन निगडी प्राधिकरण, सेक्टर 25 येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय येथे होणार आहे. संगीत क्षेत्रात काम करताना घेतलेला संगीत साधनेचा ध्यास, त्यासाठी करावा लागणारा अभ्यास, त्यामागील कष्ट, कलाकारांचे अनुभव, येणा-या अडचणींवर मात कशी करावी याबाबतची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी हा उद्देश या संगीत संमेलनाच्या आयोजनामागे आहे. भारताच्या अभिजात शास्त्रीय व लोकसंगीताशी यानिमित्ताने मुलांची जवळून ओळख होणार आहे. संगीताचे रोजच्या जीवनातील स्थान, संगीतामुळे मिळणारा आनंद व त्यामुळे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा, संगीताचे धार्मिक महत्व, शिक्षण आणि संगीताचा परस्परपूरक संबंध, विज्ञानातील संगीताचे स्थान, संगीत क्षेत्रातील करिअर याबाबत यामध्ये संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 
बुधवार (दि. 21) रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत संगीत दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता संमलेनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटन सोहळ्यात ’संगीतातील आनंद - एका कलाकाराचा प्रवास’ या विषयावर संमेलनाध्यक्ष रामदास पळसुले बीजभाषण करणार आहेत. दुसरे सत्र 11.30 ते 01.30 दरम्यान होणार आहे. यामध्ये शास्त्रीय संगीताची मूलभूत अंग गायन-तबलावादन-पेटी याची ओळख ज्येष्ठ कलाकार करून देणार आहेत. यामध्ये पौर्णिमा धुमाळ, हार्मोनियमवर प्रमोद मराठे व तबल्यावर रामदास पळसुले नृत्यासाठी पं. नंदकिशोर कपोते सहभागी होणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन कीर्तनकार चारुदत्त आफळे करणार आहेत. दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान शास्त्रीय गायन, नाट्य संगीत, कीर्तन, हार्मोनियम, तबला, नृत्य, चाली लावणे, पोवाडा, भजन, प्रबोधन गीते, ताल वाद्ये, सतार आदींविषयी कार्यशाळा होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता समीर दुबळे यांचे ’संगीताचा आस्वास कसा घ्यावा?’ या विषयावर व्याख्यान होईल. 
गुरुवार (दि. 22) रोजी सकाळी साडेनऊ वाजता डॉ. कशाळकर यांचे ’भारतीय संगीताचा इतिहास व वाटचाल’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर उपस्थितांना विविध वाद्यांच्या ओळखीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कशाळकर करतील. दुपारी तीन वाजता सलील कुलकर्णी यांचे ’दैनंदिन जीवनातील संगीत’ या विषयवार व्याख्यान होईल. सायंकाळी साडेचार वाजता संगीत संमेलनाचा समारोप समारंभ होणार आहे. यावेळी परिसरातील विविध संगीत संस्थांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच यावेळी रामदास पळसुले यांचे एकल तबला वादन होणार आहे.