Breaking News

धर्मादाय रुग्णालय शासकीय योजनांसंदर्भातील समितीत कार्यक्षम तज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी


मुंबइ,  - सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये त्या योजना योग्य रितीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. हा एकप्रकारे गरजू रुग्णांवर अन्याय आहे. शासनाने या धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन आणि दुर्बल घटकांना दिल्या जाणर्या उपचारांची गुणवत्ता, उपचार करतांना येणार्या अडचणी, उपचारांसाठी आकारण्यात येणारे शुल्क, औषधांचे दर, तसेच योजनेकरता खाटा राखीव ठेवण्यात येतात कि कसे, याची तपासणी करू न त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 28.5.2014 च्या शासन निर्णयाद्वारे डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली. या तज्ञांच्या समितीने त्रैमासिक शिफारस वजा अहवाल धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, तसेच या अहवालाची प्रत शासनास सादर करणे बंधनकारक होते. असे असतांना गेल्या 3 वर्षांत या समितीने एकही बैठक घेतलेली नाही, एकाही रुग्णालयाची तपासणी केलेली नाही, तसेच एकही अहवाल सादर केलेला नाही.अशा निष्क्रिय समितीवर शासनाचा काही अंकुश आहे का, शासनाची याविषयीची अनास्था चिंताजनक आहे, असे प्रतिपाद हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत दादर (पश्‍चिम) येथील कबुतरखाना येथे 17 फेब्रुवारी या दिवशी करण्यात आलेल्या जनआंदोलनात ही मागणी करण्यात आली. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.