निर्यात मूल्य हटविताच कांद्याचे भाव वधारले
शुक्रवारी घाऊक बाजारात कांद्याला किलोस 10 ते 15 रुपये भाव मिळत होता. त्यानंतर भावात आणखी घसरण होईल, या शक्यतेने कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अपरिपक्व, कच्चा कांदा शेतकरी बाजारात आणू लागले होते. या स्थितीत कांद्याची परदेशी निर्यात, हा एक पर्याय असतो. मात्र, काही महिन्यांपूर्वी तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशात कांद्याचे भाव कडाडले होते. त्यावेळी कांद्याची परदेशात निर्यात होऊ नये, यासाठी निर्यात मूल्य वाढविले होते. त्यामुळे जास्त भावाने कांदा निर्यात करावा लागत होता. या भावापेक्षा पाकिस्तान, इजिप्त आणि इतर राष्ट्रातील कांदा जागतिक बाजारपेठत स्वस्त उपलब्ध होत होता. त्यामुळे भारतीय कांद्याला उठाव नव्हता.
या पार्श्वभूमीवर निर्यात मूल्य हटविण्याची मागणी शेतकर्यांकडून होत होती. त्यानुसार केंद्र सरकारने निर्यात मूल्य हटविले. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत रविवारी घाऊक बाजारात कांद्याच्या भावात किलोमागे 4 रुपयांनी वाढ झाली. याविषयी बाजार समितीचे संचालक आणि कांद्याचे व्यापारी अनिल देवढे म्हणाले, कांद्यावरील निर्यात मूल्य कमी केल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. मागील आठवड्यात दररोज 250 ते 300 ट्रक कांद्याची आवक होत होती. ती घटून रविवारी 180 ते 190 ट्रक आवक झाली. आवक घटल्याने भावात वाढ झाली आहे. आता बाजारातील आवक स्थिर राहिल. शेतकरी अपरिपक्व, कच्चा कांदा बाजारात आणणार नाही.