Breaking News

रस्त्याच्या कामासाठी माजी नगरसेवक छल्लारे यांचा उपोषणाचा


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी  :- नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक आठमधील अत्यंत रहदारीच्या जिजामाता चौक परिसरातील मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांबाबत वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्यावतीने माजी नगरसेवक, मुळाप्रवराचे संचालक संजय छल्लारे यांनी मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना निवेदन दिले. रस्त्याची कामे त्वरित न झालास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला. 

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मागील काळात मंजूर असलेल्या शिवाजी रोड ते जिजामाता चौक, कुंभार गल्ली ते जिजामाता चौक, तसेच जिजामाता चौक ते शंकर भुवनपर्यंतचा रस्ता गेल्या दीड वर्षांपासून रखडला आहे. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी तोंडी आणि लेखी तक्रार देऊनदेखील प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही. 

जिजामाता चौक परिसरात नवीन मराठी शाळा, सोमय्या शाळा, खटोड कन्या विद्यालय असून सदर शाळेमध्ये रोज आठ ते दहा हजार विद्यार्थी शिक्षणाकरिता येतात. तसेच याठिकाणी अनेक खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. याशिवाय याठिकणी विविध राष्ट्रियीकृत बँका आणि ज्येष्ठ नागरिक भवन आहे. त्यामुळे येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. शुक्रवारीही याठिकाणी बाजार भरत असल्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होते. येथील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शालेय विद्यार्थी, पालक, रुग्ण, बँक ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांची नागरिक मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. मात्र आळशी प्रशासनामुळे आजपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. दरम्यान, दि. १६ तारखेपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास जिजामाता चौकात स्थानिक उपोषणास बसणार असल्याचे छल्लारे यांनी म्हटले आहे. या निवेदनावर शंभरपेक्षा अधिक नागरिकांच्या सह्या आहेत.