Breaking News

मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज - डॉ. कानडे


वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे पाहिले जाते, मात्र त्याला जन्म देणारी आई सुद्धा एकेकाळी मुलगीच होती, याचा विसर आज जनतेला पडला असून नकोशा असलेल्या मुलीला या जगात येण्यापुर्वीच तिची हत्या होते. यामुळे निसर्गातील मानवाचा समतोल ढासळत असून आज 1000 मुलांमागे फक्त 835 मुलींचा जन्मदर असून तब्बल 165 मुली मुलांपेक्षा कमी जन्म घेतात, याने मुलांचेच भविष्य धोक्यात असून आजच या नकोशीला आपलेसे करावे लागेल तरच निसर्गाचा समतोल राहील. तिला जग पाहू द्या. जसा काळ बदलतोय तसा मुलींकडे बघण्याचा संकुचित दृष्टीकोनही बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दहीगाव ने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी केले. शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व लोकनेते मारुतरावजी घुले पा. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या बेटी बचाव बेटी पढाव या किशोरवयीन मुलींच्या आरोग्य समस्याविषयी अभियानांतर्गत दहीगावने येथील घुले महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. कानडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अश्‍विनी देशमुख होत्या. आपण आईला देवासमान आदरणीय मानतो मग आजची जन्म घेणारी मुलगी हि भविष्यात आईच होणार आहे हे सर्वाना माहित असूनही तिचा बळी जन्माअगोदरच का घेतला जातो याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे त्यासाठी मुलींना जन्म घेऊ द्या, असे आपल्या प्रास्ताविक भाषणात घुले महाविद्यालयाचे प्रा. आप्पासाहेब खंडागळे यांनी मत व्यक्त केले. यावेळी निर्मला कानडे, आशा क्षीरसागर, प्रा. सुनिता ढगे कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी प्रा. दीपक देवकर, प्रा. सुनील वराट, भाऊसाहेब कवाडे, महाविद्यालयीन विद्यार्थिनीे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र नाबदे यांनी केले तर आभार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी मानले.