Breaking News

अवैध वाळूउपशाप्रकरणी 4 जण निलंबित 2 तलाठी व 2 पोलीस पाटील यांचा समावेश संगमनेर प्रांत अधिकार्‍यांची बेधडक कारवाई


संगमनेर/प्रतिनिधी : जिल्हाधिकारी अभय महाजन यांचे अनधिकृत गौणखनिजविरोधात कारवाईचे निर्देश असतानाही तालुक्यातील पठार भागातील नांदूर खंदरमाळ व मांडबे बु. परिसरातून वाहणार्‍या मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा होत आहे. याप्रकरणी संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी दोन कामगार तलाठी व दोन कामगार पोलीस पाटील अशा चौघांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. यात नांदूर खंदरमाळचे कामगार तलाठी बाळकृष्ण सावळे, कामगार पोलिस पाटील, किसन सुपेकर तर मांडवे बुद्रुक येथील कामगार तलाठी रामदास मुळे व कामगार पोलिस पाटील गंगाधर शिरसाठ यांचा समावेश आहे.
बाळकृष्ण सावळे हे तलाठी म्हणून नांदूर खंदरमाळ येथे कार्यरत असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरु होती. याबाबत कामगार तलाठी सावळे यांनी कुठलीही माहिती वरिष्ठांना न दिल्याने तसेच वाळू वाहतुकीस प्रतिबंध केला नाही. पोलीस पाटील किसन सुपेकर यांनी गौण खनिजचे जतन करण्याबाबत हलगर्जीपणा केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले. त्याचबरोबर मांडवे बुद्रुक येथे रामदास मुळे हे तलाठी म्हणून कार्यरत असताना प्रशासनाने अवैध वाळू उपशासंदर्भात बैठकीत वारंवार सूचना दिल्या. मात्र कारवाई न केल्याने तसेच तलाठी कार्यालयात हजर न राहणे आदी कारणांवरून तर पोलीस पाटील शिरसाट यांनी वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्याने कारवाई करण्यात आली. संगमनेर तालुक्यात वाळूसाठ्याचा एकही शासकीय लिलाव झालेला नाही. तालुक्यासह शहरातदेखील अवैध वाळूतस्करी जोमात सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसुल बुडत आहे. प्रशासनाने वाळू तस्करांविरोधात तालुक्यात कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.