Breaking News

बाजारातील घसरणीमुळे ऊसाचा पहिला हप्ता 2500 रूपये


सांगली, दि. 04, फेब्रुवारी - सध्या बाजारातील साखरेचे दर घसरल्याने यंदाच्या गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन पहिल्या हप्त्यापोटी अडीच हजार रूपये दर देण्याचा व ठरल्याप्रमाणे ‘एफआरपी’ची उर्वरित रक्कम कालांतराने देण्याचा निर्णय सांगली जिल्ह्यातील सर्वच सहकारी साखर कारखानदारांनी शनिवारी एकत्रितपणे जाहीर केला.
सांगली जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाना प्रतिनिधींची येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मोहन कदम, केन ऍग्रोचे प्रमुख तथा भारतीय जनता पक्षाचे सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी आमदार प ृथ्वीराज देशमुख, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड, श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणपती सगरे, हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर, श्री दत्त इंडिया कंपनीचे मृत्यूंजय शिंदे व विश्‍वास सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ पाटील आदी उपस्थित होते.बाजारातील साखरेचे दर कोसळत चालल्याने सहकारी साखर कारखान्यांसमोर मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. साखर कारखाना वाचला, तरच ऊस उत्पादक शेतकरी वाचणार आहे. आपल्या शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखानदारांनी एकत्रित येऊन पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन अडीच हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा सांगली जिल्ह्याचा साखर उतारा कमी आहे. तरीही सर्व साखर कारखानदारांनी कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच ऊसदर देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मोहन कदम व पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले.