Breaking News

राज्यात 24 हजार शिक्षकांची भरती करणार शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती


मुंबई : राज्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली लवकरच शिक्षक भरती करण्यात येणार आहे. यामुळे डीएड आणि बीएड अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या हजारे विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील सहा महिन्यात राज्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा भरल्या जाणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. तावडे यांनी ही माहिती एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात दिली. यावेळी तावडे म्हणाले की, आधीच्या पद्धतीमध्ये प्रत्येक तुकडीला एक शिक्षक अशी संकल्पना होती. पण राईट टू एज्युकेशन ही संकल्पना मोडित निघाली. त्यानंतर आघाडी सरकारच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या संख्येमागे शिक्षक अशी संकल्पना सुरु झाली. त्यात 30 विद्यार्थ्यांमागे एक, तर 60 विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक दिले जायचे. पण यावर शिक्षक आमदार कोर्टात जाऊन, या निर्णयाला स्थगिती आणायचे. त्यामुळे एकीकडे शिक्षक भरती करुन घ्यायची आणि दुसरीकडे कोर्टाकडून स्थगिती मिळायची. त्यामुळे तत्कालिन सरकारने शिक्षक भरतीच बंद करुन टाकली.

तावडे पुढे म्हणाले की, पण आम्ही संख्या मान्यतेच्या आधारे शिक्षक भरती कशी योग्य आहे? हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सिद्ध केले, आणि त्यानंतर सेंटर भरती केली. कारण, अनेक शिक्षकांचा आग्रह होता की, शिक्षक भरतीवेळी काही संस्थाचालक पाच लाखापासून ते 15 लाखापर्यंतची मागणी करतात. तेव्हा हा भ्रष्टाचार थांबवण्याचे आवाहन शिक्षकांनी केले होते. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सेंटर शिक्षक भरती करुन घेतली. यात एक ते 78 हजार असा प्राधान्यक्रम निश्‍चित करुन जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या थांबवल्या. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यातील शिक्षकांच्या बदल्यांची शेवटची प्रक्रिया पूर्ण झाली की शाळेप्रमाणे शिक्षकभरती पुन्हा सुरु केली जाईल. गेल्या काही वर्षात शिक्षकभरती झालेली नाही. त्यामुळे डीएड, बीएडच्या अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या अनेक विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली होती. पण आता शिक्षकभरती लवकरच होणार असल्याने डीएड. बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.