Breaking News

खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदघाटनाचा धडाका पालिकेच्या 20 लाखांचा चुराडा

सातारा/प्रतिनिधी ;- सातारा नगरपालिकेचा मनमानी कारभार थांबावा. भेदभाव न करता शहरातील सर्व रस्त्यांचे पॅचिंग करावे. नगरसेवकांची कामे अडवू नयेत, आदी मागण्यांसाठी नगर विकास आघाडीने तीव्र आंदोलन केल्यानेच सातारा विकास आघाडीला आपली चूक मान्य करावी लागली आहे. आमचे आंदोलन हे पालिकेच्या चुकीच्या कारभाराविरोधात होते. त्यामुळे आंदोलनाचा आणि वाढदिवसाचा संबंध तरी काय? असा सवाल विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी उपस्थित करतानाच वाढदिवसाला मुख्यमंत्री आणा नाहीतर पंतप्रधानांना बोलवा. आम्हाला फक्त शहराच्या विकासाशी मतलब आहे. वाढदिवसाचे कारण पुढे करता आहात मग, हेलिपॅड आणि उदघाटनाच्या नावाखाली जनतेच्या 20 लाख रुपयांचा चुराडा करण्याचे कारण काय? असा सवालही मोने यांनी उपस्थित केला आहे. 


खा. उदयनराजे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री नकोत म्हणून विरोधकांचा डाव आहे, असा कांगावा उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केल्यानंतर मोने यांनी राजेशिर्के यांच्या वक्तव्याचा प्रसिध्दीपत्रकाद्वारे चांगलाच समाचार घेतला आहे. सदर बझार येथील भुखंडाचे भांडवल करु नका, असे म्हणून चुकीच्या कृत्याला पाठीशी घालण्यापेक्षा आपल्या चुका सुधारा. एकहाती सत्ता आहे म्हणून वाट्टेल तसे वागू नका. नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी कराल, मनमानी कराल आणि जिथे चुकाल तिथे नगरविकास आघाडी तुमच्या विरोधात भक्कमपणे उभी राहील. त्याचा प्रत्यय नुकत्याच आंदोलनामुळे आला असेल. आंदोलनामुळे तुमचा मनमानी कारभार उघड झाला. पण, त्याकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे म्हणून मुख्यमंत्री, वाढदिवस अशी पत्रकबाजी करुन तुमचे कारनामे लपणार नाहीत. सातारकरांबद्दल नगरविकास आघाडीला आस्था आहे का नाही, हे आमच्या कृतीतून आम्ही नेहमीच दाखवले आहे. नेत्यांचा वाढदिवस आणि पालिकेचा काही संबंध असायचे कारणच नाही. पण, तुम्ही नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विकासकामांच्या उदघाटनांचा घाट घालून वाढदिवसाचाच फुगा केला आहे. खुश्शाल उदघाटने करा पण, हेलिपॅड आणि उदघाटन कार्यक्रमांसाठी नगर पालिकेच्या तिजोरीतून 20 लाख रुपयांचा चुराडा सातारकरांच्या आस्थेपायीच करत आहात का? असा खोचक सवालही मोने यांनी उपस्थित केला आहे. पालिकेचा पैसा म्हणजे नागरिकांचा पैसा आहे. नागरिकांकडून कररुपाने पैसा वसुल केला जातो तो पैसा नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी विकासकामे करण्यासाठी खर्ची घालणे संयुक्तिक आहे. नगर पालिका म्हणजे तुमची मालमत्ता नाही. भव्यदिव्य वाढदिवस साजरा करा. मुख्यमंत्रीच नव्हे तर, पंतप्रधानांनाही बोलवा. आम्हाला हरकत असण्याचे काहीच कारण नाही. पण, उदघाटनाच्या नावाखाली पालिकेच्या पैशांचा चुराडा करण्यापेक्षा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि साविआतील सर्व नगरसेवकांनी कॉन्ट्रीब्युशन काढून खर्च करावा. नागरिकांच्या कररुपी पैशाची कशाला उधळपट्टी करताय? असा रोखठोक सवाल मोने यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधार्‍यांना नगारिकांचा किती पुळका आहे, किती आस्था आहे हे गेल्या 1 वर्षाच्या कारभारातून दिसले आहेच. आता वाढदिवसाच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा तुमचा डाव आहे.