Breaking News

सिंधुदुर्गात 150 नवीन मोबाईल टॉवर उभारणार - खा. विनायक राऊत


सिंधुदुर्गनगरी  - सिंधुदुर्गात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 150 नवीन मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा मोबाईल कव्हरेज क्षेत्रात समाविष्ट होणार आहे. जवळपास 300 टॉवरला नवीन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे ज्या भागातील टॉवर बंद आहेत, त्याची माहिती तात्काळ मिळणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा दूरसंचार सेवेत देशात नंबरवन आहे. त्यामुळे येत्या काळात ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा दूरसंचार सल्लागार समितीचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.

या बैठकीत समितीच्या सदस्या तथा जि. प. माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांनी दूरसंचार सेवेच्या सेवेविषयी तीव्र भावना मांडल्या. दूरसंचारचे लँडलाईन फोन, केबल निकृष्ट यामुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे लँडलाईन कनेक्शन बंद करत आहेत, अशी माहिती त्यांनी केली. त्यावर केबल ठेकेदाराला समज देण्याच्या सूचना राऊत यांनी दिल्या.
राऊत म्हणाले, सिंधुदुर्गात 300 टॉवर अद्ययावत केले जाणार आहेत. येत्या मार्च-एप्रिलपर्यंत 150 टॉवरला नवीन तंत्रज्ञान जोडले जाणार आहे. यामुळे ज्या भागात टॉवर बंद राहील, त्याची माहिती दूरसंचार अधिकाऱयांना तात्काळ मिळणार आहे. कुणकेश्‍वर, आंगणेवाडी, सोनुर्ली, आंबोली या महत्वाच्या ठिकाणी मोबाईल कव्हरेज वाढवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.