Breaking News

‘अमृतमहोत्सवा’तील ‘मराठी बाणा’ ठरला कळसाध्याय!


सोनई प्रतिनिधी :- ज्येष्ठ साहित्यिक, माजी खा. यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यातील ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम संपूर्ण कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरला. उत्साहपूर्ण वातावरणात अमृतमहोत्सवाची सांगता होत असताना गडाखसाहेबांवर अभिष्टचिंतनाचा प्रचंड वर्षाव झाला.
अमृतनगरी सकाळपासूनच गर्दीने फुलली होती. सर्वत्र प्रसन्नता जाणवत होती. सायंकाळच्या रम्य वातावरणात अमृतनगरीतील विद्युतदिवे मालवण्यात आले अन् व्यासपीठावरून ' ऊठी ऊठी गोपाळा' या भूपाळीचे स्वर आळवले गेले. कोवळ्या सूर्यकिरणांची आभा सर्वत्र पसरत जावी तसे विजेचे प्रकाशझोत प्रकाशमान होऊ लागल्याने सर्वांचे लक्ष व्यासपीठाकडे वेधले. दाटीवाटीने उभी असलेली कौलारू घरे व त्या सभोवतीची परसबाग, मंदिरांची शिखरे, गर्द निसर्ग असे जणू अख्खा गावंच व्यासपीठावर दिसत होते.

संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, जनाबाई आदी संतांमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक गंगा दुथडी भरून वाहते आहे. संत वाड्मयाने मराठी भाषेतील अमृत दाखवून दिले, असे निवेदन सुप्रसिद्ध दिग्दर्शक डाॅ. अशोक हांडे हे करत असताना गाव जागवत वासुदेवाची स्वारी आली. सुवासिनी सुपात धान्य घेऊन वासुदेवाच्या झोळीत घालण्यास घराबाहेर येऊ लागल्या व दान पावलं म्हणत वासुदेव पुढे निघत असतानाच गावगाड्यात सुरू झालेली लगबग उपस्थितांची वाहवा मिळवणारी ठरली. हरिनामाची कास धरून महाराष्ट्राने अस्मानी संकटे पचवली. हे 'रूप पाहता लोचनी...' या गीताआधारे सांगितले जात असतानाच व्यासपीठावर दिंडी सोहळा साकारला. याचवेळी विठ्ठल- रूक्मिणीच्या वेशभूषेतील कलाकारांना पाहून श्रोत्यांनी हात उंचावत जयघोष केला.

'झुंजू मुंजू पहाट झाली. कोंबड्याने बांग दिली...'या गीतापाठोपाठ 'व्हलगडी दादा व्हल रे' हे शेतकरी नृत्य झाले. बिरोबाच्या नावान चांगभलंचा जयघोष 'सुंबरानं मांडलं गं सुंबरानं मांडलं' या धनगरी नृत्यात सामावला. ' तुझ्या रूपाचं बाशिंग डोक्यात..' हे बहारदार गीत निसर्गाच्या कुशीत रमलेल्या आदिवासी संस्कृतीकडे लक्ष वेधणारे ठरले. ठाकरी शैलीतील ' आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं..' या गितावरील नृत्य ठाकरांची चपळता दाखवून गेले. 'लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला' या पंक्तीवर अनेकांनी ताल धरला. ' माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं...' आणि ' शेत बघा आलंया राखणीला सोन्याचं घुंगरू गोफणीला..' या गीताने मराठमोळ्या मातीतील श्रमसंस्कृतीचा गौरव केला. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल..' या भक्तीगीताने अठरापगड जातीतील भक्त विठ्ठल चरणी लीन होत असल्याचे गुज सांगितले. महाराष्ट्राला पडलेले अध्यात्मिक स्वप्न म्हणजे गवळण. ' नेसली गं बाई चंद्रकळा ठिपक्यांची,तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची..' या गिताने गवळणीचे लाजणे-मुरडणे दाखवून दिले. सुया घे..पोत घे...मणी घे..ही दुर्मिळ होत चाललेली आरोळी ऐकताच महिलांसह पुरूषांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मध्य॔तरानंतर यशवंतराव गडाख यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात डाॅ. अशोक हांडे यांचा सत्कार करण्यात आला. डाॅ. हांडे यांनीही सर्व कलाकारांच्यावतीने गडाख साहेबांना सन्मानित केले. यावेळी बोलताना गडाख म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती- कला या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतासह भारताबाहेर पोहोचवून आपण नव्या पिढीला महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दाखवून देत आहात. डाॅ. हांडे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणातील सुशील व संपन्न व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित असलेल्या यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात सहभागी होऊन त्यांना वंदन करण्याची संधी आम्हा कलाकारांना मिळाली, हे आम्ही आमचे भाग्यच समजतो. राजकारणी लोकांची मुले म्हणजे चहापेक्षा किटली गरम! पण प्रशांत गडाख यांनी विनम्रपणे निमंत्रण देत बहुमान दिला. 

अमृतनगरीतील शिस्तबध्द नियोजन आम्हा सर्वांना फार आवडले. शिस्त लावता येत नसते, ती अंगी असावी लागते. येथील उत्तम नियोजनामुळेच महिला निर्धोकपणे मोठ्या संख्येने आल्या आहेत. डाॅ. सुभाष देवढे यांनी सत्कार सोहळ्याचे नेमकेपणाने सूत्रसंचालन करताना ‘मराठी बाणा’चा हा १ हजार ९५१ वा प्रयोग असल्याची माहिती दिली. 'हर हर महादेव'चा जयघोष करत मावळे धावत असताना आणि नगारा दणाणत असताना ' मराठी पाऊल पडते पुढे..' हे गीत सुरू झाले. त्यासोबत व्यासपीठावर शिवशाही अवतरली अन् श्रोते अवाक होऊन पहातच राहिले. कार्यक्रम संपला, असे जाहिर करावे लागले, इतके सर्व दंग झाले होते. परतीच्या वाटेवर असलेल्या गर्दीतून यशवंतराव गडाख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाताना प्रशांत गडाख व शंकरराव गडाख यांच्या नियोजनाचे भरभरून कौतुक चालले होते.