Breaking News

नगरसेवकांमार्फत प्रभागाप्रभागात स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीला मिळणार गती

नवी मुंबई, दि. 31, जानेवारी - स्वच्छ सर्वेक्षण 2018 ला सामोरे जात देशात स्वच्छतेत असलेला आठवा नंबर पहिला करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून सर्वजण एकत्रितपणे काम करत असून या कामाची गती वाढविण्यासाठी आज लोकप्रतिनिधींची बैठक बोलविण्यात आल्याचे नमुद करीत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी नगरसेवकांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश त्यांच्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. 


नगरसेवकांनी आपल्या प्रभागात फिरून नागरिकांच्या समुहांशी संवाद साधावा व त्यांना सर्वेक्षणाच्या अनुषंगाने विचारल्या जाणा-या स्वच्छता विषयक प्रश्‍नांची माहिती द्यावी व शहरात स्वच्छतेमध्ये झालेल्या बदलाचीही माहिती द्यावी असे महापौरांनी सांगितले. 
स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही.के. जिंदाल यांनी नवी मुंबई भेटीप्रसंगी येथील स्वच्छता कामांची प्रशंसा करताना लोकप्रतिनिधी व प्रशासन यामध्ये नवी मुंबईत चांगला संवाद असल्यामुळे उत्तम काम होत असल्याचे अभिप्राय दिला असून याव्दारे स्वच्छ सर्वेक्षण कामाला एकत्रितपणे अधिक गती मिळेल असा विश्‍वास महापौर सुतार यांनी व्यक्त केला.