Breaking News

सर्पदंशानंतरच्या योग्य उपचारांनी वाचले प्राण

जळगाव, दि. 31, जानेवारी - चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी ( लक्ष्मीची वाडी ) येथील बाळकृष्ण भिकाजी दराडे (वय 30) हे दुपारी शेतात काम करीत असतांना त्यांना विषारी नागाने दंश केला. त्यानंतर त्यांना तातडीने तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे वैदयकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दराडे यांच्यावर योग्य उपचार केल्याने त्यांचा जीव वाचला. डॉ. प्रमोद सोनवणे हे बाळकृष्ण दराडे यांच्यासाठी देवदुत ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.


बाळकृष्ण दराडे हे आपल्या शेतात नियमितपणे शेती काम करीत होते. यावेळी त्यानी स्वच्छतेसाठी शेतातील पाईपलाईन मध्ये हात घातला असता पाईप लाईनमध्ये घुसून बसलेल्या 6 फुटी तीव्र विषारी नागाने दंश केला. पाईपात हात घातल्यानंतर त्यांना बोटाला दंश झाल्याचे जाणवल्याने त्यांनी तात्काळ बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हात मागे घेत असतांनाच बोटाला धरूनच नाग पाईपातून बाहेर निघाला. त्यानंतर दराडे यांनी कसा तरी त्या नागाच्या जबडयातून होत बाहेर काढला. त्यांना लागलीच त्यांच्या वडीलांनी तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता बाळकृष्ण दराडे यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. योग्य उपचारामुळे काही वेळातच दराडे यांच्या प्रकृतीत फरक पडला. ते लवकरच ठणठणीत होतील असे डॉ. प्रमोद सोनवणे यांनी सां गितले. घटनेनंतर तळेगाव आरोग्य केंद्रात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सर्व उपस्थितांकडून डॉ. सोनवणे व कर्मचारयांनी सर्पदंशाच्या रूग्णावर उपचार करून त्याला जीवदान दिल्याने त्यांचे कौतुक केले.