Breaking News

जळगावात ‘पद्मावत’ विरोधात रास्ता रोको

जळगाव, दि. 31, जानेवारी - चाळीसगाव तालुक्यासह शहरात पद्मावत चित्रपटाला विरोध वाढत आहे. पोलीस प्रशासन व चित्रपटगृह चालकांना निवेदन दिल्यानंतर संघटना थेट रस्त्यावर उतरल्या आहेत. मंगळवारी राष्ट्रीय राजपुत करणी सेनेसह इतर संघटनांनी शहरातील सिग्नल चौकात रास्ता रोको केला. त्यामुळे सिग्नल चौकातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यावेळी पोलिसांनी रास्ता रोको करणार्‍या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.


चित्रपट दिग्दर्शक संजय भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटात महाराणी पद्मावती यांचा इतिहास मांडताना इतिहासाचे विद्रूपीकरण केल्याचा आरोप राजपूत समाजाने केला आहे. पद्मावत चित्रपटामुळे राजपुत समाज व हिंदु धर्मियांच्या भावनांना ठेस पोहचली आहे. त्यामुळे हा वादग्रस्त सिनेमाचा राजपुत समाजाकडून विरोध होत आहोत. 


या चित्रपटाचे प्रदर्शन रोखावे, यासाठी राष्ट्रीय राजपुत करणी सेना, रयत सेना, संभाजी सेना, महाराणा प्रताप युवा सेना, महाराणा प्रताप मित्र मंडळ , हिंदु सुर्य प्रताप बहुददेशीय संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान या संघटनांनी आज, स्टेशन रस्त्यावरील सिग्नल चौकात रास्ता रोको केला. तसेच घोषणाबाजी व निदर्शने तसेच जोरदार घोषणाबाजी करून हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी केली. या वेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखली. त्यामुळे काही वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती. आंदोलनास भारतीय जनता युवा मोर्चाने पाठिंबा दिला.