Breaking News

कोपर्डीत प्रजासत्ताकदिनापासुन भरणार शेळी- मेंढी बाजार


कुळधरण/प्रतिनिधी/- कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आता दर शुक्रवारी शेळी-मेंढीचा बाजार भरणार असल्याची माहिती सरपंच रोहिणीताई सुद्रिक यांनी दिली.सरपंच रोहिणीताई सुद्रिक यांच्या पुढाकारातुन गेल्या तीन महिन्यापासुन शुक्रवारचा आठवडे बाजार सुरु करण्यात आला.त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आपल्या उत्पादित मालाची विक्री करणे सुलभ झाले. तसेच व्यावसायिकांना कुळधरण बरोबरच शुक्रवारी कोपर्डी येथे बाजाराचा फायदा होत आहे. आठवडे बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत असुन बाजारासाठी होणारी कुळधरण येथील पायपीट संपली असल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.आता ग्रामस्थांच्या प्रयत्नातुन प्रजासत्ताक दिनापासुन दर शुक्रवारी सकाळी शेळी-मेंढीचा बाजार भरविण्यात येणार आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेळी- मेंढीचे उत्पादन होत असलेल्या भोसे, रूईगव्हाण, शिंदे आदी गावातील उत्पादकांची यामुळे सोय होणार आहे. कोपर्डीला जोडणारे सर्व रस्ते डांबरीकरणाचे आहेत. ग्रामपंचायतने गावठाणातील पाच एकर जागा बाजारासाठी उपलब्ध करुन दिली आहे.गावातील नेतेमंडळी तसेच कार्यकर्ते आपल्या गावात सुरु होत असलेल्या बाजाराच्या यशस्वीतेसाठी सध्या प्रयत्नशिल आहेत. राशीन येथे मंगळवारी भरत असलेल्या जनावरांच्या बाजाराला भेट देवुन व्यापारी तसेच विक्रेत्यांना माहिती दिली जात आहे. पुढील सलग ३ दिवस तालुक्यात बाजार सुरु होत असल्याची माहिती व प्रचार यंत्रणा कार्यरत राहणार आहे.या बाजारात शेतकऱ्यांनी शेळी,मेंढी,बाेकड विक्रीसाठी आणावेत असे आवाहन सुर्यभान सुद्रिक तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.