आम्ही टाकळीकरच्या बारव सुरक्षा व सुशोभिकरण या चौथ्या प्रकल्पाचे शुक्रवारी लोकार्पण
संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ऐतिहासिक बारवेची सुरक्षा व सुशोभिकरण हा प्रकल्प आम्ही टाकळीकर ग्रुपने ग्रामपंचायतच्या सहकार्याने राबविला आहे. बारवेवर नेत्रदीपक कारंजे बसविण्यात आले असून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. बारवेला सुरक्षीत कठडे बसविण्यात आले आहेत. यामुळे गावातील मुख्य बाजारपेठेचे वैभव परत प्राप्त होण्यास मदत होईल. यावेळी पारनेर तालुक्यातील पंचायत समिती गण निहाय दहा उपक्रमशील प्राथमिक शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. मागील वर्षी तालुक्यातील विविध सामाजिक संस्थाना हे पुरस्कार दिले होते. यावेळी नव्याने तयार करण्यात आलेल्या आम्ही टाकळीकरच्या वेबसाईटचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात कार्यरत भूमिपुत्रांनी चार वर्षापूर्वी एकत्र येत तयार केलेल्या आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानने पहिल्या वर्षी जलशुद्धीकरण प्रकल्प,दुसऱ्या वर्षी अमरधाम परिसर सुशोभिकरण व शौचालय प्रकल्प,तिसऱ्या वर्षी मराठी शाळा सुशोभिकरण व स्पर्धा मार्गदर्शन केंद्र तर आता चौथ्या वर्षी ऐतिहासिक बारवेची सुरक्षा व सुशोभिकरण हा प्रकल्प तयार केला आहे. दरवर्षी गावासाठी एक लोकपयोगी प्रकल्प देण्याचे ग्रुपचे धोरण व भूमिका आहे. कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान, ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांनी केले आहे.
