Breaking News

सायबर सुरक्षेबाबत मंत्रालयात दोन दिवस जनजागृती अभियान

मुंबई, दि. ५ : सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे ही आजची गरज आहे. याबाबत सतर्क राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी आज केले.मंत्रालयातील परिषद सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता दोन दिवसीय सायबर सुरक्षा जागरुकता अभियान राबविण्यात येत आहे. आज या अभियानाचे उद्घाटन श्री.सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. 


त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत, आयसीआयसीआय बँकेचे उप महाव्यवस्थापक ग्यान बराह, विभागीय व्यवस्थापक उमंग शहा, रोहित वाघधरे, युआयडीएआयचे सहायक महासंचालक बिपिन खोत, मुख्यमंत्री फेलोशीपचे द्विप राच्छ आदी उपस्थित होते.

नवीन पिढी ही माहिती तंत्रज्ञानाच्या खूप जवळ आहे, असे सांगून श्री.सिंह पुढे म्हणाले, सायबर सुरक्षेबाबत योग्य ज्ञान, बाळगावयाची सावधानता सर्वांपर्यंत पोहोचविणे हे खूप महत्वाचे आहे. त्यासाठीच पोलीस रेझिंग डे च्या निमित्ताने सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. अनोळखी ई-मेल्स उघडू नयेत, वायरस असणाऱ्या पेनड्राईव्ह अथवा इतर उपकरणांचा वापर टाळावा व त्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही सतर्क राहून अधिक सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.