Breaking News

जामखेड नऊ नगरसेवकांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून निवडून आलेले, मात्र नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला मतदान केलेले तसेच जाहीरपणे भाजपचे चिन्ह असलेले डिजिटल बोर्ड छापून भाजपवासी झालेल्या नऊ नगरसेवकांवर पक्ष शिस्तभंग केल्याने, सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्याचे स्पष्ट आदेश प्रदेश राष्ट्रवादीने स्थानिक पदाधिकार्‍यांना दिल्याचे समजते.


नगरपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून निवडुन आलेले आणि नगराध्यक्ष निवडीच्या वेळी पक्षशिस्त मोडलेल्या नगरसेवक विद्या राजेश वाव्हळ, गणेश आजबे, संदिप गायकवाड, लता गायकवाड, गूलशन अंधारे, सूरेखा राळेभात, सुमन शेळके, निखिल घायतडक, फरिदा पठाण या नऊ नगरसेवकांबाबत नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात यावा असे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आहेत. 

त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे तसा प्रस्ताव पुराव्यानिशी देणार असल्याचे एका स्थानिक पदाधिकार्‍याने सांगितले. राज्यात अशा शिस्त भंग प्रकरणांमध्ये अनेक जि. प. सदस्य आणि नगरसेवक यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.त्यामुळे जामखेडमध्ये राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.