Breaking News

बोदवड ओडिएच्या वीज पुरवठ्याचे बिल शासनाने भरावे - आ. खडसे

जळगाव, दि. 04, जानेवारी - बोदवड तालुक्यात ऐणगाव येथील कार्यक्रम आटपून बोदवड शहरातील विश्रामगृहावर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आले असता बोदवड तालुक्यातील पाणीप्रश्‍नी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधत ओडीए योजनेवरील वीजवितरणची थकबाकी बिल शासनाच्या कोट्यातून भरावे यासाठी पालकमंत्री यांच्याशी चर्चा करा व मी सुध्दा चर्चा करणार आहे. तसेच शहरासह तालुल्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्याचे आदेश तहसिलदारांना द्यावे अशा सूचना आ. खडसे यांनी दिल्या.

 
तसेच तालुक्यातील शेती पंपांची व पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा वीज वितरण कंपनीने सुरु केला आहे. हा प्रकार बंद करण्यात यावा तसेच मागणी असलेल्या ठिकाणी रोहित्र देण्यात यावे याबाबत आपण ऊर्जामंत्री बावन्नकुळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली असल्याचे आ. खडसे यांनी सांगत खासदार व माझ्या आमदार निधीतून शहरामध्ये हाइमास्ट लॅम्प तसेस गरज असेल तिथे पथदिवे लावण्याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्याशी चर्चा करत तत्काळ विकास आराखडा तयार करून शहरात विकास कामे करावीत. मका व सोयाबीन खरेदी लवकरात लवकर सुरू करत शेतकर्‍यांना योग्य ते सहकार्य करावे याबाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना सूचना दिल्याचे आ. खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.