Breaking News

नोकर्‍या मागणारे नव्हे, तर देणारे बना- डॉ. रामनाथ कोविंद

मुंबई : व्यवसायातील छोट्या मोठ्या संधींचा लाभ घेत नोकर्‍या देणारे बना, असा मंत्र देशाचे राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी आज दिला. उत्तन (जि. ठाणे) येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आर्थिक जनतंत्र परिषद (इकोनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह) चे उद्घाटन करतांना ते बोलत होते. या परिषदेत ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातील मुद्रा योजना, दलित व्हेन्चर कॅपिटल, स्टार्ट अप अशा योजनांचा लाभ घेतलेले 200 यशस्वी उद्योजक सुद्धा होते. 


या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉ. चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार यांचीही उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आर्थिक आणि सामाजिक समानता ही देशाच्या लोकशाहीला अधिक बळकट करेल असे सांगितले. संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो अशी अगतिकता असू नये, तर नोकरीतल्या संधी भलेही सोडेल पण मी स्वत: रोजगार निर्माता बनेल, स्वत:चा व्यवसाय सुरु करेल अशी भावना त्यामागे हवी, असेही राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपती पुढे म्हणाले की, समाजातील काही वंचित आणि शोषित युवक रिफायनरी, रुग्णालय, हॉटेल्स अशा व्यवसायांमध्ये स्वत:ला सिद्ध करून यशस्वी होत आहेत. ‘डिक्की’ सारखी संस्था त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करीत असल्याबद्धल राष्ट्रपतींनी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचे कौतुक केले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशा परिषदेमुळे आणि त्यातील अनुभव कथनामुळे प्रगतीचा नवा मार्ग आपल्याला मिळेल. सक्षमीकरण हा शब्द उच्चारायला सोपा आहे मात्र प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी खूप प्रयत्नांची गरज आहे. परंतु, प्रधानमंत्र्यांनी त्याची सुरुवात केली असून वंचित आणि दुर्बल घटकाना देखील आर्थिक अधिकार मिळतील अशा योजना आणल्या आहेत.