उडीद खरेदी केंद्रावर आज शेवटच्या दिवशी ऑनलाईन नोंदणी करूनही शेतकर्यांचा उडीद न घेतल्याने संतप्त शेतकर्यांनी सायंकाळी जामखेड बीडरोडवर अचानक केलेला रास्तारोको पोलिसांनी शेतकर्यांना दमबाजी करत हाणून पाडला. आंदोलनातील शेतकर्यांना उडदाच्या वहानासह ताब्यात घेतले. शासनाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या अडीच महीन्यांपासून उडीद खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या उडीद खरेदी केंद्रावर शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनही पंधरा दिवसांपासुन उडीद खरेदीला शेतकर्यांचे नंबर लागत नव्हते. यापुर्वीही दि. 8 डिसेंबर रोजी येथील उडीद खरेदी केंद्राच्या मनमानी कारभाराला कंटाळून शहरातील खर्डा चौकात याच पद्धतीने अचानक रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी देखील नोंदणीकृत असलेल्या सर्व शेतकर्यांचे उडीद खरेदी करून घेण्यात येतील असे अश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. शासनाच्या परिपत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकर्यांचा उडीद खरेदी करण्याची दि. 12 जानेवारी शेवटची तारीख होती, त्यानुसार उर्वरित शेतकर्यांनी उडीद भरलेल्या वाहनासह नंबर लावून दिवसभर बसले होते. मात्र सॉफ्टवेअर मध्ये तांत्रिक बिघाडामुळे सायं. 5 वाजेपर्यंत उडीद खरेदी करण्यात आला नाही, त्यामूळे आता आपला घेणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकर्यांनी आपली माल भरलेली वाहने जामखेड - बीड रोडवर अडवी लावुन अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केले. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागून वाहतुक विस्कळीत झाली होती. यावेळी पोलिसांनी शेतकर्यांबरोबर दमबाजी करून वाहने काढून घेण्यास भाग पाडले. काही शेतकर्यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले.
शेतकर्यांचा अचानक रास्तारोको उडीद भरलेली वाहने रस्त्यावर ; शेतकर्यांना घेतले ताब्यात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
19:30
Rating: 5