कालव्याची कामे पूर्ण न झाल्यास पक्षत्याग : अॅड. थोरात
यावेळी दादासाहेब गुंजाळ, इंजि. हरिभाऊ चकोर, भीमराज चत्तर, भाजप उपाध्यक्ष पुंजाहरी दिघे, सचिव भरत फटांगरे, बाबूराव खेमनर, आप्पासाहेब आहेर आदींच्या संख्यानिशी निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, की अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रवरानदीवर बांधण्यात आलेल्या निळवंडे धरणातून निघणाऱ्या उजव्या व डाव्या कालव्याव्दारे जिल्हयातील अकोले, संगमनेर, राहुरी, राहता, श्रीरामपूर, कोपरगाव या सहा तालुके व नाशिक जिल्हयातील सिन्नर असे एकूण सुमारे ६४ हजार २६० हेक्टर ( १,५८,५०० एकर ) क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळतो. यासाठी माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तत्कालिन सरकारने सन १९७७ मध्ये १५ कोटी ८६ लाख रकमेच्या निळवंडे प्रकल्पाला मान्यता देऊन त्यावेळी काम सुरु करण्यात आले होते. त्यानंतर या धरणाच्या कामासाठी माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री आंणि माजी केंद्रीयमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, कै. विलासराव देशमुख, तत्कालीन भाजपा प्रदेश अध्यक्ष कै. सूर्यभान वहाडणे, माजी उपमुख्यमंत्री कै. गोपीनाथ मुंडे या सर्वांनी वेळोवेळी या प्रकल्पाच्या कामाला गती दिली. नगर जिल्ह्यात कार्यकर्त्यांची कमतरता असतानादेखील आम्ही गावोगावी फिरून प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा प्रचार केला आहे. विधानससभा निवडणूकीच्यावेळी पक्षाने जनतेला निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्याचे काम चाऱ्यांसह पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. याची आठवण करून देत पक्षाचे माजी अध्यक्ष अॅड. थोरात यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते आणि माजी पदाधिकाऱ्यांनी या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.
