Breaking News

ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत नेण्याचे कार्य स्व. भाऊसाहेब थोरातांचे : प्रा. खरात


संगमनेर प्रतिनिधी - उजाड माळरानावर नंदनवन फुलविण्याचे काम स्व. भाऊसाहेब थोरात यांनी केले. नव्या पिढीला स्व. थोरातांचे विचार मार्गदर्शक व ऊर्जा देणारे आहेत. ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत नेण्याचे कार्य स्व. थोरातांनी केले, असे प्रतिपादन आदिवासी जनसेवक प्रा. बाबा खरात यांनी केले.
स्व. भाऊसाहेब थोरात यांचे विचार व प्रबोधन जागर रथयात्रेचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्ञानेश्‍वर सांगळे, अनिल घुगे, उपसरपंच कराड, एम. एम. खेमनर, बाळासाहेब ऊंबरकर, सत्यानंद कसाब, सरपंच बाबासाहेब दिघे, प्रभाकर कांदळकर, सचिन दिघे, बाबासाहेब दिघे, संतोष दिघे, इम्रान शेख, चंद्रकांत कडलग, बाबूराव गवांदे आदी उपस्थित होते. वडगांव पान, निळवंडे, करुले, तळेगाव, दिघे, नान्नज दुमाला, निमोण या ठिकाणी या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. गीत गायन, प्रबोधनाच्या माध्यमातून या यात्रेला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे.

प्रा. खरात म्हणाले, की स्व. थोरात यांनी ग्लोबल वार्मिंगचा धोका टाळण्यासाठी दूरदृष्टीतून दंडकारण्य चळवळ सुरु केली. आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली विविध संस्थांनी दंडकारण्य अभियानांतर्गत तालुक्यात विविध झाडांचे, बियांचे रोपण केले आहे. स्व. भाऊसाहेब थोरातांच्या व्यक्तिगतऐवजी विचारांची पूजा व्हावी, यासाठी संयोजन समितीने विचार प्रबोधन रथयात्रेचे आयोजन केले आहे. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा हे कार्यक्रम लोकसहभागातून राबविला पाहिजे. या प्रबोधन जागर रथयात्रेसाठी जगन बर्डे, बाबासाहेब बर्डे, भाऊसाहेब गाडेकर, शिवराम बिडवे, केशव फड, कैलास मोकळ यांचे कलापथक विशेष परिश्रम घेत आहे.