Breaking News

शिर्डी-सिन्नर चौपदरीकरणाच्या हालचाली झाल्या गतिमान पंचक्रोशीतील शेतकरी धास्तावले


शिर्डी / प्रतिनिधी :- केंद्र आणि राज्य सरकारच्या समृद्धी योजनेअंतर्गत होत असलेल्या या प्रकल्पात जात असलेल्या जमीनधारकांना शासनाने मोठ्या प्रमाणावर चांगला भाव दिला. भरपाई कमीतकमी वेळेत देण्याचा प्रयत्न करून शासनाने शेतकऱ्यांचा विश्वास मिळविला. या पार्श्वभूमीवर शिर्डी ते सिन्नर चौपदरीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सिन्नर ते सावळीविहीर फाटा या दरम्यान चौपदरीकरणात दोन्ही बाजूने जे क्षेत्र जाते, त्या जागेत सिमेंटचे पोल बसवून ठेवण्यात आले आहेत. या महामार्ग नक्की किती मोठा होणार, यात आपले किती क्षेत्र जाणार, या विचाराने येथील शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. 
दरम्यान, या संदर्भात आ. स्नेहलता कोल्हे यांनी थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर संबंधित शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. काही शेतकरी राहाता तालुक्यातील पुढार्यांकडेही गेले होते. मात्र त्यांना घाबरू नका, सरकारकडे पैसे नाहीत, असे सांगण्यात आले. असे असताना थेट आता घराच्या दारातच सिमेंट पोल लावून रस्ता किती मोठा होणार, याचे संकेत रस्ते विकास महामंडळाने दिले आहेत. त्यामुळे आता काय होईल ते होईल, या विचारापर्यंत शेतकरी आले आहेत. डोळ्यादेखत क्षेत्र जाण्याचे पाहणे काहींच्या नशिबी आले असताना काही मात्र भरपाई किती मिळेल, भाव कसा राहील, बागायतीसाठी किती, जिरायतीचा काय भाव, बांधकामाची भरपाई कोणत्या भावाने मिळणार असली आकडेमोड करण्यात गर्क झाले आहेत. काहींनी थेट एवढ्या धावपळीत चार-पाच फूट आंब्याचे रोपे लावून यामुळे तरी आपले क्षेत्र वाचेल, अशी शक्कल लढविली आहे. यासाठी काहीजण रोपे लावण्याच्या प्रयत्नात असून यामुळे आंब्याच्या रोपांना रोपाला या भागात मागणी वाढली आहे.