Breaking News

संपादकीय - विचारधारेचे बटीक !


विचारवंत कुणाला म्हणावे असे एक नवेच आव्हान समाजासमोर उभे ठाकले आहे. पुर्वीच्या काळी एखाद्या समाजमान्य विचारवंताने आपले विचार मांडले की अवघा समाज त्या विचारांना आपल्या जीवनाचे इथिक मानायचा. आज मात्र सार्‍याच विचारांचे मातेरे झाल्यासारखे झाले असून त्याला सर्वस्वी हे विचारवंतच जबाबदार आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. समाजाचे प्रबोधन व्हावे, समाजाचे शिक्षण व्हावे, त्यातून विचारांनी साक्षर झालेला समाज अधिकाधिक सामर्थ्यवान होऊन एकसंघ रहावा. यासाठी खरे तर विचारवंत नावाच्या प्राण्याची समाजाला गरज असते. विचारवतांकडून समाजाला हीच अपेक्षा असते. मात्र बदलत्या काळाबरोबर विचारवंतांची व्याख्या बदलू लागली, रचनाही बदलू लागली. एखाद्या संगणकात हार्डडिस्क वारंवार बदलून संगणकाची क्षमता तसेच दर्जा कमी जास्त करावा तसे या विचारवंतांचे होऊ लागले आहे. एकविसाव्या शतकातील विचारवंतांना उपजत म्हणावी अशी स्वतःची विचारधारा उरली आहे का? असा प्रश्‍न पडावा इतपत या विचारवंतांची पातळी घसरू लागल्याने समाज दिशाहीन होत आहे. सैरभेर झाला आहे आणि याच चंचल अस्वस्थतेतून सामाजिक एकोपा धुळीस मिळाला आहे. म्हणूनच आजच्या बिघडलेल्या समाज आरोग्याला कथित विचारवंतांना जबाबदार ठरविण्यास आम्हाला यत्किंचितही भिती वाटत नाही. आजचे विचारवंत म्हणजे कुठल्या न कुठल्या विचारधारेचे बटीक असल्यासारखे बरळू लागले आहेत. कुणी पुरोगामी, कुणी प्रतिगामी कुणी कर्मठ धर्मवादी या ठेल्यांवर गुलाम असल्याप्रमाणे वक्तव्ये करून विचारवंत असल्याचा शिक्कामोर्तब करू लागले आहेत. खरे तर विचारवंतांला स्वतःचा विचार असतो. तो कुणाच्या दावणीला बांधल्याप्रमाणे बेताल गरळ ओकत नाही. प्रसंगी अवघा समाज अंगावर घेण्याची उर्जा विचारवंतांच्या तत्वज्ञानात समावलेली असते तो खरा जातीवंत विचारवंत. आजकालच्या वक्तव्यांवर नजर फेकली तर सगळेच विचारवंत पहिल्या धारेची ढोसून बडबडत असल्यासारखे वाटत आहे. समाजाला आराध्य असलेल्या एखाद्या महापुरूषाचे नाव घेतले तर रातोरात प्रसिध्दीचा झोत अंगावर पडतो आणि विचारवंत म्हणून मान्यता पावल्याचे समाधान मिरविता येते. अशा भ्रमात वावरणार्‍या विचारवंतांची पिलावळ आज भारतात हैदोस घालू लागली आहे. अशा पिलावळींमुळेच खरे तर देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होतो आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, समाजाने ज्यांना त्यांच्या विशिष्ट क्षेत्रातील कर्तृत्वामुळे डोक्यावर घेतले, मानसन्मान दिला अशा मंडळींनीही विचारवंत बनण्याच्या नादात अक्षम्य चूक करावी खरे तर नसते झोंगाट ओढवून घेण्याची बुध्दी सुचणे म्हणजे विनाशकाल ओढवून घेण्यासारखे आहे ही साधी बाब या कथित विचारवंतांना समजू नये हाच त्यांच्या विचारवंत असण्याचा मोठा पुरावा ठरू शकतो. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास निर्माण केला त्या महापुरूषांमध्ये तुलना करण्याचे धाडस दाखवून या मंडळींना नेमके काय साध्य करायचे आहे? खरे तर प्रत्येक महापुरूष त्यांच्या जागेवर श्रेष्ठ आहेत. त्यांनी कधीही जात धर्म पाळले नाहीत. मग अमुक एक महापुरूष अमुक एका जाती धर्माचा असता तर त्याला अधिक सन्मान मिळाला असता असे वक्तव्य करण्याचा गाढवपणा हे विचारवंत का करतात हाच खरा प्रश्‍न आहे.