Breaking News

उदयनराजे यांच्याकडून भिडे यांची पाठराखण

नवी दिल्ली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे वडिलधारे व्यक्तिमत्त्व आहे, त्यांचे काम खूप मोठे आहे आणि त्यांच्या विरोधात बोलण्याची कुणाची लायकी नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भिडे गुरूजींच्या अटकेची मागणी करणार्‍या मंडळींना फटकारले आहे. संभाजीराव भिडे आणि उदयनराजे भोसले यांच्यातील एकमेकांबद्दलचे आदराचे संबंध लक्षात घेता उदयनराजे या प्रश्‍नी काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते. 


दिल्लीत एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे यांनी संभाजीराव भिडे यांच्याबाजुने बोलताना त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांच्याबद्दल असा विचार करणेही चूक आहे त्यांच्यावर आरोप करणा-यांची लायकी नाही, तसेच मिलिंद एकबोटेही माझा मित्र आहे तो असे काही करेल अश शक्यता नाही. कोरेगाव भीमा येथे झालेल्या प्रकाराबद्दल संभाजीराव भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी सातत्याने होत आहे त्याबद्दल त्यांना प्रश्‍न विचारला असता ते त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीच त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही फटकारले. 

ते म्हणाले जितेंद्र माझा मित्र आहे तो आमदार आहे, कुठे काय बोलावं, का बोलावं आणि कसं बोलाव याचा त्याने विचार करावा. हिंसाचारामुळे दोन हजार कोटींचं नुकसान झाले, अशी उद्रेक करणारी वक्तव्यं करु नयेत. वैयक्तिक स्वार्थासाठी असे प्रकार करणे चुकीचे आहे. जातीच्या आधारावर देशाचे तुकडे होण्याआधी माझे डोळे मिटलेले बरे, असेही उदयनराजे म्हणाले.