Breaking News

महापालिका क्षेत्रातील भिंतीना सप्तरंगी साज

डोंबिवली, दि. 21, जानेवारी - स्वच्छ सर्वेक्षण - 2018 या उपक्रमात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चांगलाच पुढाकार घेतला असून आता शहरातील विविध शाळेमधील विद्यार्थ्यांनाही या सर्वेक्षणात पालिकेने सहभागी करुन घेतले आहे. या उपक्रमांस आजपासून शहरातील विविध दुर्लक्षित भिंतीवर स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश देणारा सप्तरंगी साज चढवला जात आहे. या भिंती रंगविण्यात विद्यार्थी देखील चांगलेच रमल्याचे दिसून आले.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण-2018 या उपक्रमांतर्गत ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करुन ओल्या कच-यापासून कंपोस्ट खत तयार करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध स्तरातील नागरिक, सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालयांना सहभागी करुन घेणे, स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर आणि प्रभाग निहाय स्वच्छता दुत नेमणे, मोबाईल अ‍ॅपद्वारे कच-याची तक्रार करण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करणे. रॅली काढणे, सभा घेणे, पत्रके वाटणे असे विविध कार्यक्रम राबविले जात आहे. यामध्ये आयुक्त पी. वेलरासू यांनी चांगला पुढाकार घेवून आपल्या अधिकारी व कर्मचा-यांना या कामात सहभागी करुन घेतले आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिकेने शाळेतील विद्यार्थ्यांना महापालिका शाळा व परिसरातील ओस पडलेल्या व दुर्लक्षित भिंतींना नवसंजीवनी देण्यासाठी भिंतीवर स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जनजागृतीपर भिंती चित्र काढण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. परिसरातील विविध भिंतीना पालिकेतर्फे व्हाईटवॉश करुन देण्यात आले आहे. त्यामुळे या भिंतींना नवा साज चढवण्यात विद्यार्थ्यांनाही उत्साह आला आहे. विशेष म्हणजे ठाकूरवाडी, डोंबिवली पश्‍चिम येथील संवाद कर्णबधीर शाळेतील मुलांनी देखिल भिंतीचित्रे रेखाटली आहेत. विद्यार्थ्यांच्या या आगळया वेगळया उपक्रमाचे कौतुक आयुक्त पी.वेलरासू यांनी केले आहे.