Breaking News

‘जलयुक्त शिवार’मुळे दोन वर्षात राज्य दुष्काळमुक्त होणार - मुख्यमंत्री


गेल्या तीन वर्षात राज्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यातील अकरा हजार गावे जलपरिपूर्ण झाली असून यावर्षी आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. जलयुक्तमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झाले असून या गतीने पुढील दोन वर्षे कामे केली तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत सन 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ति, संस्था, अधिकारी व पत्रकारांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले. यावेळी मृदा व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे,राज्याचे मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले,आयुक्त दीपक सिंघला, कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी,अधिकारी उपस्थित होते. यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या लोगोचे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच लोगो तयार स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या किशोर गायकवाड यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या आसूड या त्यांच्या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी सांगितलेल्या उपायातूनच जलसंधारणाची ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली. निसर्गावर, पावसावर अवलंबून राहलो तर शेतीचा शाश्वत विकास होऊ शकणार नाही. राज्यातील 82 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू असून राज्यातील सर्व धरणे भरली तरीही 50 टक्के क्षेत्र पाण्याखाली येऊ शकणार नाहीत. त्यामुळे या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. यापूर्वीही जलसंधारणाच्या 14 योजना सुरू होत्या मात्र, त्यामध्ये समन्वय नसल्यामुळे त्याचा उपयोग होत नव्हता. जलयुक्त योजना राबविताना जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली या सर्व योजना एकत्र केल्या. यामुळे पहिल्याच वर्षी जलयुक्त योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. लोकसहभाग व प्रशासन हेच या योजनेचे खरे शिल्पकार आहेत.