आठ महिन्यांपासून ब्राम्हणी ग्रामपंचायतीला त्या बारा लाख रुपयांची प्रतिक्षा
आठ महिन्यापुर्वी केंद्र सरकारने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंचायत सशक्तीकरण अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा गौरव केला होता. त्यामध्ये नगर जिल्हा परिवषद व राहुरी पंचायत समिती ने प्रथम येण्याचा मान पटकावला. तर लोणी बुद्रुक व ब्राम्हणी ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामाची छाप पाडत प्रत्येकी १२ लाख रुपयांचे तर, झेडपी ५० लाख व पं.स राहुरी ३० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
मात्र २४ एप्रिल २०१७ रोजी उत्तर प्रदेश येथील बक्षिस वितरण कार्यक्रमात केवळ प्रमाणपत्र देत गौरविण्यात आले होते. दरम्यान सदर बक्षिस रक्कम तात्काळ खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, गेली आठ महिने झाले तरीही रक्कम प्राप्त झालेली नाही. मोठा गाजावाजा करत गावांचा गौरव करणाऱ्या केंद्राकडे अद्याप बक्षिसाच्या रक्कमेची तरतुद होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.