Breaking News

गुरु गोविंद सिंग म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम - मुख्यमंत्री


गुरु गोविंद सिंग यांचे संपूर्ण जीवन हे संघर्षमय असून आपल्या समाजाचे गुलामीपासून व संस्कृतीवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी आपल्यासह संपूर्ण परिवाराचे बलिदान करुन एक लढवय्या पंथाची स्थापना केली. त्यामुळे गुरु गोविंद सिंग म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

नांदेड येथील गुरुद्वाऱ्यामध्ये श्री. गुरु गोविंद सिंग यांच्या 350 व्या प्रकाशपर्व कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार सर्वश्री सरदार तारा सिंग, हेमंत पाटील, डॉ. तुषार राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, सचखंड गुरुद्वाराचे संतबाबा कुलविंतसिंगजी, गुरुद्वारा लंगरसाहिबचे संतबाबा बलवंसिंगजी, नांदेड परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, संतुक हबर्डे उपाध्यक्ष स. भुपिंदर सिंघ मिनहास, सचिव स. भागिंदर सिंघ घडीसाज, आदी उपस्थिती होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नांदेड येथील गुरुद्वारा येऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतल्यानंतर नवीन ऊर्जा मिळते. गुरु गोविंद सिंग यांनी या पंथास बलिदानाचे विशेष परंपरा प्राप्त करुन दिली असून त्यांनी स्वाभिमानी समाजाची निर्मिती केली. भक्ती व शक्तीच्या रुपाने गुरु गोविद सिंग यांनी भारताला नवीन मार्ग दाखविल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.