Breaking News

डाक विभागाला अवकळा, आधुनिक तंत्रज्ञानाचा फटका


कुळधरण/प्रतिनिधी /- सध्याच्या कुरीअर,मोबाईल,इंटरनेटच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा केंद्र सरकारच्या डाक विभागाला फटका बसला आहे. डाक विभागाच्या पत्रपेट्यांकडे कुणीही फिरकत नसल्याने पत्रपेट्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पोस्टाच्या पेट्यांना पत्रांची प्रतीक्षा असल्याचे चित्र दिसत आहे .
दोन दशकांपूर्वी विनिमयाचे प्रभावी माध्यम असलेल्या डाक विभागाला आता अवकळा आली आहे. मोबाईल,इंटरनेट, फेसबुक, व्हाट्सॲप आदींचा मोठया प्रमाणावर वापर होत असल्याने डाक विभागाची सेवा कालबाह्य ठरत आहे. मोबाईलवरून संवाद साधण्याच्या सुविधेमुळे भूतकाळातील पत्र टाकून खुशाली विचारण्याच्या फाटा दिला जात आहे. ग्रामीण भागातील पत्रपेट्यांची सध्या मोठी दुरावस्था झाल्याचे दिसते.अनेक डाकघरानजीक लटकवलेल्या पत्रपेट्या गायब झाल्या आहेत. 

काही ठिकाणच्या पत्रपेट्या गंजून पेटीला छिद्रे पडली आहेत. तर काही पेट्या जमीनदोस्त झाल्या आहेत. सध्या फक्त शासकीय कामकाजाचाच पत्रव्यवहार काही प्रमाणात सुरु आहे. मात्र ग्रामीण भागातील पत्रपेट्यांची दुरावस्था पाहता पत्र कोठे टाकायचे?हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कार्यालये नियमित उघडलीही जात नसल्याने पत्र वेळेवर पोहचण्याची शाश्वती राहिली नाही. अनेक डाक कार्यालयांचे फलकही गायब झाले आहेत. त्यामुळे डाक कार्यालयांचे अस्तित्वही गायब होण्याचा संदेश मिळत आहे.