Breaking News

ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान द्या - गिरीष महाजन

नाशिक - जिल्हा विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असून लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी गावपातळीवर जावून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्वांच्या योगदानातून ग्रामीण विकासाच्या शासनाच्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि विकासप्रक्रीया अधिक गतीमान होईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 

महाजन म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेमध्ये लोकसहभागामुळे चांगले यश दिसून आले असून सामाजिक संस्था, उद्योग, संघटनांच्या सहभागामुळे ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सुटण्यास मदत झाली आहे. स्वच्छ भारत अभियानातदेखील असाच लोकसहभाग अपेक्षित आहे. या अभियानात देशपातळीवर जिल्ह्याचा नावलौकीक करण्यासाठी अधिका धिक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, नाशिक-त्र्यंबकेश्‍वर कुंभमेळ्याचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा यादीत केल्याने याठिकाणी येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढेल. एमटीडीसीच्या माध्यमातूनही पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. त्र्यंबकेश्‍वर येथे ‘निर्मल वारी’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी आणि भाविकांच्या सुविधेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘नमामी नर्मदे’च्या धर्तीवर गोदावरी स्वच्छतेसाठी ‘नमामी गोदे’ हा उपक्रम सुरु करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणाले, समिती सदस्यांच्या सूचनांचा विचार योजनांची अंमलबजावणी करताना करण्यात येणार आहे. प्रामुख्याने ग्रामीण रस्ते तसेच पायाभूत विकास कामांना ध्यानात घेऊन नियोजन केले जाईल. रस्ते कामांचा दर्जा उत्तम राखला जावा आणि कामात पारदर्शकता रहावी यासाठी कामांची माहितीचे फलक ठिकाणावर लावले जावेत, अशी सुचना त्यांनी केली.