रुळाच्या जॉईन्टमध्ये बिघाड; हार्बर सेवा विस्कळीत
नवी मुंबई, - पनवेल - सीएसएमटीकडे जाणारी लोकल नेरूळ ते जुईनगर स्थानका दरम्यान आली असता रुळाच्या जॉईन्टमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्याने या मार्गावरील लोकल सेवा आज दुपारी विस्कळीत झाली होती. अखेर रुळाची दुरुस्ती झाल्यावर दुपारी अडीच वाजता सेवा पनवेल - मुंबई मार्गावरील सेवा सुरळीत सुरू झाली.
दुपारी 12. 22 वाजताची पनवेल - सीएसएमटी ही लोकल नेरूळहून जुईनगरला जात असतांना या मार्गावर रुळाच्या जॉईन्ट मध्ये बिघाड झाल्याचे मोटारमनच्या लक्षात आले. त्यामुळे पनवेल हून मुंबईच्या दिशेने जाणा-या सर्व लोकल त्वरित रद्द करण्यात आल्या. आठवडाभरा पूर्वी मेगा ब्लॉक घेतल्यानंतर 26 डिसेंबरला बेलापूर स्थानकात ओव्हरहेड वायर तुटली होती. त्या वेळीही लोकल सेवा विस्कळीत झाली होती. आता आज पुन्हा तांत्रिक कारणामुळे लोकसेवा विस्कळीत झाली असली,तरी प्रत्यक्षात रेल्वे प्रशासनाकडून योग्य अनाउन्समेंट न केल्याने प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला.
दरम्यान खारघर पासून लोकलच्या रांगा लागल्या होत्या. अनेकांना सीबीडीपासून लोकल सुरू असल्याचा समज झाल्याने प्रवाशांनी सीबीडी स्थानकापर्यंत पायी प्रवास केला. प्रत्यक्षात तेथेही लोकलच्या रांगा लागल्याचे पाहून प्रवाशांचा रागाचा पारा चढला व त्यांनी आरपीएफ व मोटरमन यांना घेराव घातला होता. रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका आजही चाकरमान्यांना सहन करावा लागला. मुंबईहून पनवेलच्या दिशेने येणा-या सर्व लोकल सेवा तात्पुरत्या खंडित करण्यात आल्या होत्या; मात्र ठाणे - पनवेल सेवा सुरळीत सुरू होती.