भाविकांना लुटणाऱ्या एजंटांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी
यावेळी शिष्टमंडळामध्ये सरपंच तथा विश्वस्त डॉ.हर्षवर्धन पालवे,माजी सरपंच विक्रम दहिफळे,विश्वस्त अरुण दहिफळे,राजेंद्र भंडारी,लक्ष्मण दहिफळे,राजेंद्र दहिफळे आदी उपस्थित होते. सुमारे नऊशे ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. मोहटादेवीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. देवस्थान समितीने कोट्यावधी रुपये खर्चून केलेले जिर्णोध्दारचे काम देशातील मंदिरामध्ये अग्रेसर ठरल्याने धार्मिक पर्यटनासाठीचा भाविकांचा ओढा देवस्थान समितीकडे वाढला आहे. याचा गैरफायदा घेत एजंटगिरी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून भाविकांना त्रास होऊ लागला.
देवस्थान पासून सहा किलोमीटर अंतरापासून असे एजंट दुचाकीवरून पाठलाग करतात. पुढे मोबाईलवर गाडी क्रमांक सांगून गाडी अडविण्याची सूचना दिली जाते. प्रतिष्ठित घरातील अनेक महिला,मुली या एकट्याने देवी दर्शनासाठी येतात,अशा गुंडांकडून पाठलाग सुरू झाली की त्यांची घाबरगुंडी उडते. मुख्य रस्त्यापासून देवी गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कमानी पासून एजंट महिलांकडून वाहने अडवून पूजा साहित्य आतमध्ये टाकून पूजा साहित्य घेण्याची बळजबरी केली जाते. वाहने कितीही वेगाने असली तरी या महिला रस्त्यावर अशा उभ्या राहतात की चालकाला वाहन थांबवावे लागते. वीतभर कापडाचा खण व त्यापेक्षा मोठ्या कापडाची साडी कागदामध्ये पॅकिंग करून साडी-चोळी भासवली जाते.
२५ रुपयांचे कापड,१५ रुपयांचे नारळ, पाच रुपयांचे हळद-कुंकू, दोन रुपयांच्या हिरव्या बांगड्या अशा वस्तूंचे शंभर रुपयांपासून पाचशे दर ठरवला जातो. वाहकांना भुलवण्यासाठी एजंटांकडून सीडीचे अमिष दाखवले जाते. वास्तविक एका वेळी किमान एक हजार भाविक सहजपणे देवीचे दर्शन घेतील, एवढा मोठा गाभारा असून दर्शन पासची गरज नवरात्रात सुद्धा भासत नाही.एवढे सुटसुटीत दर्शन भाविकांचे होते. एजंटांकडून सामान न घेतल्यास काही महिला अंगलट करतात तर काही चक्क मनगट पकडतात. गाडीच्या काचा न उघडताच गाडीवर सामान भिरकावून पुढे नंबर सांगितला जातो. मूळ दुकानांपुढे गाडी अडवून पैशाची मागणी केली जाते.पैसे न दिल्यास शिवीगाळ, दमदाटी, अरेरावी ठरलेली आहे. काही महिला तर अत्यंत वेगळेच प्रदर्शन करत भाविकांना भुलवण्याचा प्रयत्न करतात.परिसरात यांची मोठी दहशत असून देवस्थान समिती, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी हतबल झाले आहेत. संघटित गुंडगिरीमुळे सायंकाळ नंतर भाविक फारसे दर्शनासाठी फिरकत नाहीत. एजंटांच्या दहशतीमुळे भाविकांची संख्या घटण्याची भीती ग्रामस्थांना वाटून देवस्थान समिती, ग्रामपंचायतीकडून तालुका व पोलीस प्रशासनाकडे एजंटगिरी व लुटालुटी संदर्भात बऱ्याच महिन्यांपासून लेखी व तोंडी पाठपुरावा सुरू आहे.
मात्र प्रशासनाकडून हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. पोलिसांबरोबर यातील काहींची उठबस असून काही एजंटांनी राजकीय पक्षांचा आश्रय घेतला आहे. देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळात तहसीलदार पदसिद्ध विश्वस्त असून त्यांना देखील हे सर्व प्रकार माहीत आहेत. याचा अनुभव देखील त्यांनी घेतलेला आहे. या प्रकारांना पायबंद न घातला गेल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कधीही हाताबाहेर जाऊन ग्रामस्थ विरुद्ध एजंट असा वाद कधीही होऊ शकतो. अशा गुंडगिरीमुळे देवस्थान व मोहटे गावाची बदनामी होऊन भाविकांकडून सक्रिय योगदान घडू शकत नाही. काही व्यावसायिकांनी मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर पथाऱ्या मांडल्या असून भाविकांशी असभ्य वर्तन करतात.अशा एजंट व व्यावसायिकांमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात.ग्रामपंचायती कडून शक्य त्या सर्व उपाय योजना हाती घेऊन अशा प्रवृत्तींचा बिमोड करण्याचा प्रयत्न झाला.प्रशासनाकडून सततच्या पत्रव्यवहाराला कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर येत्या १७ तारखेपासून तहसील कार्यालयापुढे उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.
