Breaking News

अधिकार नसूनही ईडीकडून छापेमारी : चिदंबरम

नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति यांच्या 5 घरांवर शनिवारी सकाळी ईडीच्या अधिकार्‍यांनी छापेमारी केली. महत्वाची बाब म्हणजे यावेळी कार्ती यांचे वडील आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम घरी उपस्थित होते. एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात अनियमितता आढळल्याने ईडीन दिल्ली आणि चैन्नईतल्या 5 संपत्तीवर ही छापेमारी केली. याआधीही ईडीने कार्ति चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चैन्नईतल्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. 


त्यानंतर पुन्हा ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या छाप्यात ईडीच्या हाती काही लागले नसल्याचे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. सूडभावनेतून ही कारवाई होत असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला. पैशाच्या अफरातफरीचा आरोप आहे आणि या आरोपांमध्ये ईडीने धाडी टाकणे याचा काहीही संबंध नाही. पण तरीही छापेमारी होत आहे. तसेच जोरबागमध्ये जो बंगला आहे तो कार्तिचा नाही तर माझा आहे, असे चिदंबरम म्हणाले. तसच घरातील किचन, ड्रॉईंग रुमसह सर्व घराची झाडाझडती घेतली, तरीही ईडीला काहीही मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले.