Breaking News

20 हजार कोटी खर्चाचा वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करणार - नितीन गडकरी

ठाणे, दि. 12, जानेवारी - मुंबई पुणे द्रुतगती महामार्गापेक्षाही मोठा असा वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्ग 20 हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार आहे. येत्या 3 महिन्यात भूसंपादन व आवश्यक कामे सुरु होतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

वर्सोवा खाडीवर नव्या चौपदरी पुलाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जिल्ह्यातील इतर 7 रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री त्याचप्रमाणे केंद्रीय महामार्ग मंत्री यांच्या हस्ते मिरा रोड येथील एस के स्टोन मैदान येथे इलेक्ट्रॉनिक नामफलकाची कळ दाबून झाले, यावेळी ते बोलत होते.


नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात येणार्‍या काळात विकसित वाहतूक आणि दळणवळण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली न्हावा शेवा शिवडी, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड सारखे प्रकल्प मार्गी लागतील असे ते म्हणाले. दोन वर्षांत10 हजार सी प्लेन्स आम्ही आणणार आहेत असे सांगून ते म्हणाले कि, सागरी जेट्टी, आणि पोर्ट यांना मंजुर्‍या देण्यात येतील. वसई तसेच विरार भागात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून त्यामुळे जेएनपीटीतील मोठ्या कंटेनर्सच्या वाहतुकीचा त्रास कमी होईल. मीरा भाईंदर तसेच इतर पालिकांनी देखील इथेनॉल, बायो डीझेल, इलेक्ट्रिकवर परिवहन सेवेच्या बसेस चालवाव्यात आणि खर्चात बचत करावी.