Breaking News

वाहतूक नियमांचा भंग करणा-यांवर लक्ष ठेवणार सॉफ्टवेअर


नागपूर, दि. 12, जानेवारी - वारंवार वाहतूक नियमांचा भंग करणा-यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. त्यासाठी शासनाने ‘ट्राफिक व्हायोलेन्स डाटाबेस’ सॉफ्टवेअर विक सित केले असून त्याच्या उपयोगितेचे प्रात्याक्षिक केले जात आहे. हे सॉफ्टवेअर येत्या सहा महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे आज, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात देण्यात आली. 
सामाजिक कार्यकर्ते परमजीतसिंग कलसी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, सातत्याने वाहतूक नियम मोडणार्‍यांवर प्रत्येक गुन्ह्यासाठी अधिक कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु, सध्या एका व्यक्तीने किती वेळा वाहतूक नियम मोडले हे तपासण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर प्रत्येक गुन्ह्यासाठी सारखीच कारवाई केली जाते. ‘ट्राफिक व्हायोलेन्स डाटाबेस’ सॉफ्टवेअर कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक नियम मोडणार्‍या प्रत्येकाचा डेटा गोळा होईल. संबंधित व्यक्तीने किती गुन्हे केले हे एका क्लिकवर पुढे येईल. त्यानुसार योग्य ती कारवाई करणे शक्य होईल. याशिवाय शासन प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता आटोरिक्षाला जीपीएस यंत्रणा बसविण्यावर विचार करीत आहे. यासंदर्भात विविध शक्यता पडताळल्या जात आहेत.