Breaking News

गोंदियात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

गोंदिया, दि. 12, जानेवारी - गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) बोअरवेल गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने अद्यापही समस्या मार्गी लावलेली नाही.


प्राप्त माहितीनुसार बीजीडब्ल्यू रुग्णालयाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन लिकेज झाल्याने येथील पाणी पुरवठा बंद आहे. तर रुग्णालयातील दोन्ही बोअरवेल बंद असून त्यांची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी रुग्णांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.जिल्ह्यातील एकमेव शासकीय महिला रुग्णालय असल्याने येथे दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येथे येतात.आधीच रुग्णांच्या नातेवाईंकांची उपचारासाठी धावपळ सुरू असताना आता मात्र त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या रुग्णालयाच्या परिसरात मागील काही दिवसांपासून रक्तपेढीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

रुग्णालयात आधीच पाण्याची समस्या असताना बांधकामासाठी येथील बोअरवेलच्या पाण्याचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. बांधकामासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर केल्याने मोटार बिघडल्याचे बोलल्या जाते. मागील दोन दिवसांपासून रुग्णांची पाण्यासाठी भटकंती सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने केवळ नाममात्र उपाय योजना करुन याकडे दुर्लक्ष केले आहे.बीजीडब्ल्यू रुग्णालयात पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारी बोअरवेल तीन महिन्यापूर्वी सुध्दा बिघडली झाली होती. तेव्हा सुध्दा बोअरवेल दुरूस्तीसाठी आठ दिवस लागले होते. आता पुन्हा तिच समस्या निर्माण झाली असून ती मार्गी लावण्याकडे रुग्णालय प्रशासनाचे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.