नागपुरात 1 फेब्रुवारीपासून पीसीआर-लॅब कार्यान्वीत होणार
सिकलसेल रूग्णांच्या दुरावस्थेसंदर्भात न्यायालयाने स्वतःहून (सुमोटो) दाखल करून घेतलेल्या जनिहत याचिकेवरील सुनावणीदरम्यान शासनाने न्यायालयाला सांगितले की, सिकलसेल आजाराचे अस्तित्व असलेल्या कुटुंबात जन्मणार्या बाळाला सिकलसेल आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी गर्भजल तपासणी केली जाते. त्या तपासणीत बाळाला सिकलसेल आजार आढळून आल्यास पुढील आवश्यक निर्णय घेणे शक्य होते. विदर्भातील सिकलसेल रुग्णांच्या सुविधेसाठी मेयो व मेडिकल रुग्णालयांत 2006 साली गर्भजल तपासणी प्रयोगशाळा स्थापन झाल्या आहेत. परंतु, आवश्यक तज्ज्ञ व कर्मचारी नसल्यामुळे दोन्ही प्रयोगशाळांचा उपयोग होऊ शकला नाही. सध्या गर्भजलाचे नमुने मुंबईला पाठवावे लागत असून पीडितांना प्रत्येक नमुन्यामागे सुमारे 5 हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने यासंदर्भात वेळोवेळी आवश्यक आदेश दिलेत. परिणामी, शासनाने दोन्ही रुग्णालयांतील प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी वेगात हालचाली करायला सुरुवात केली आहे.
