Breaking News

बाबा रामदेवच सरकारचे खरे लाभार्भी : अशोक चव्हाण

मुंबई : आपले सरकार सेवा केंद्रामार्फत पतंजलीची उत्पादने विकण्यास परवानगी देणारे, राज्य सरकार पतंजलीचे एजंट झाले असून बाबा रामदेवच या सरकारचे खरे लाभार्थी आहेत. त्यामुळे सरकारने मी लाभार्थी जाहिरातीत बाबा रामदेवांचे छायाचित्र टाकावे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. 


चव्हाण म्हणाले की, राज्य सरकार जनतेच्या हिताची कामे सोडून आता पतंजलीसारख्या कंपनीचे वितरक बनले आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या माध्यमातून पतंजलीची उत्पादने विकण्याचा घाट सरकारने घातला आहे. यापूर्वीही राज्य सरकारने कवडीमोल दराने पतंजलीला 600 एकर जमीन दिली आहे. बाबा रामदेव यांनी काँग्रेस सत्तेत असताना विदेशातील काळ्या पैशाबद्दल अनेक बेछूट आरोप केले होते. विदेशी बँकांमध्ये भारतीयांचे 25 लाख कोटी रुपये असल्याचा शोध रामदेव बाबांनी लावला होता. त्यावेळी मोदींनी त्यांची पाठराखण केली होती. परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर मोदींनीच विदेशी बँकांमध्ये 25 लाख कोटी नसल्याचे जाहीर करून घुमजाव केले. 

सत्तेत येण्यासाठी बाबा रामदेवांनी भाजपची मदत केली होती त्याची परतफेड म्हणून सरकार पतंजलीवर मेहेरबान झाले आहे. कोट्यवधी रूपयांचा नफा कमावणार्‍या पतंजलीच्या उत्पादनांची विक्री राज्य सरकारच्या सेवा केंद्रामार्फत करणे देशातील इतर नवउद्योजकांवर अन्यायकारक आहे. सरकार फक्त काही निवडक लोकांसाठीच कार्यरत असून बाबा रामदेव त्यापैकी एक आहेत हे स्पष्ट झाले आहे. त्यापेक्षा सरकारने राज्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीची सोय करून द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.