Breaking News

दहशतवादी अब्दुल कुरेशीला अटक दिल्ली पोलिसांची मोठी कामगिरी

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राजधानीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याला बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातमधल्या साखळी बॉम्बस्फोटातही याचा सक्रिय सहभाग असल्याचेही समोर आले आहे. कुरेशीकडून बॉम्ब तयार करण्याचे सामान जप्त करण्यात आले आहे.


अब्दुल सुभान कुरेशी हा दहशतवादी 26 जानेवारी रोजी राजधानीत मोठा बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होता. पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी 50 वाँटेड दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्या यादीत इंडियन मुजाहिद्दीनचा हा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याचेही नाव होते. इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना बॉम्बस्फोट घडवण्यासाठी कुरेशी हा उद्युक्त करत असल्याचेही समोर आले आहे. दिल्लीच नव्हे तर देशातल्या इतर भागातील दहशतवादी हल्ल्यातही कुरेशी सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 2008च्या बॉम्बस्फोटात मुजाहिद्दीनच्या ज्या दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. त्यांनीही चौकशीत कुरेशी याचे नाव घेतले होते. इतकेच नव्हे तर गुजरातमधल्या दहशतवादी हल्ल्यातही कुरेशीचा हात होता. गेली 15 वर्ष पोलीस कुरेशीचा शोध घेत होते. त्याला भारताचा बिन लादेन म्हटले जाते. त्याला दहशतवादाचा हायटेक चेहरा मानले जाते.