Breaking News

चंद्रकांतदादांना ‘कानडी’ प्रेमाचे भरते


राज्यातील भाजपचे गुजरात प्रेम जसे लपून राहिलेले नाही, तसेच आता भाजपचे कानडी प्रेम देखील आता उफाळून आले असून, कानडी प्रेमाचे गोडवे त्यांनी गायला सुरूवात केली आहे. मात्र ते गोडवे महाराष्ट्रातील एक मराठी भाषिक मंत्री ज्यावेळेस गातो, त्यावेळेस मराठी माणंसाला आश्‍चर्य वाटत असले, तरी भाजपच्या गोटातून मात्र आश्‍चर्य व्यक्त केले जात नाही. बेळगांव पट्ट्यातील मराठी भाषिकांना नेहमीच अपमानास्पद वागणूक देणार्‍या कानडी सरकारचे गोडवे गाण्यात धन्यता मानणारे चंद्रकांत दादा पाटील यांचे मराठी भाषिकांचे बेगडी प्रेम पुन्हा उघडे पडले आहे. भाजप या पक्षांला मराठी भाषिकांशी काही घेणे देणे नसून, राजकारणांशी स्नेह टिकवून ठेवत, सत्तेसाठी कानडी प्रेमांचे भरते, लपून राहिलेले नाही. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दोन नंबरचे स्थान असलेले नेते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते महसूलमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे कानडी भाषिकांचे प्रेम सध्या उफाळून आले आहे. त्यामुळे ते सध्या सार्वजनिक ठिकाणी कानडी भाषिक गीत गात, त्यांची महती पटवून देतांना दिसून येत आहे. वास्तविक कानडी राज्यात मराठी भाषिक पट्टा म्हणून जो ओळखला जातो, तो बेळगावच्या पट्टयात मराठी भाषिकांवर कानडी लोकांकडून अनेकवेळेस अन्याय अत्याचार करण्यात आले. बेळगांवचा पट्टामध्ये कर्नाटक सरकार लक्ष देईना, आणि महाराष्ट्र सरकार काही पावले उचलेंना अशीच अवस्था आज त्या पट्ट्यातील जनतेंची आहे. कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास मराठी भाषिकांवर कायदेशीर कारवाई करू असा तुघलकी फतवा कर्नाटकाच्या मंत्र्यांनी काही दिवंसूर्वी काढला होता. त्याला महाराष्ट्रातून जोरदार विरोध दर्शवित मराठी भाषिकांनी आंदोलन पुकारले होते.कितीही अन्याय करा पण महाराष्ट्र प्रत्येक मराठी माणसाच्या श्‍वासातच आहे. ‘जय महाराष्ट्र ’ म्हणणे आमचा जन्मसिद्ध अधिकारही असल्याचे दाखवून देत ‘जय महाराष्ट्र’ च्या जयघोषाने मराठी भाषिकांनी संपूर्ण सीमाभाग दणाणून सोडला होता. कदाचित त्याचा विसर चंद्रकांतदादांना पडला असावा. मराठी भाषेंची अस्मिता त्यांची गळून पडली असावी, त्यामुळेच त्यांना कानडी भाषेचे भरते आले असावे. वास्तविक बेळगांवातील मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचे धोरण नेहमीच कानडी सरकारने राबवले आहे. दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणे, कर्नाटक राज्याचा अवमान करणे आदी गंभीर गुन्हे लादून मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कर्नाटक सरकारकडून करण्यात आला. यापूर्वी न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा मराठी भाषिकांना मराठीतून परिपत्रके मिळत नाहीत. कन्नड सक्तीकरण करून जाणीवपूर्वक मराठी भाषिकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मराठी भाषिकांचे अनेक तुकडे झालेत. ते जोडण्याचे काम येत्या काळात होईल, अशी अपेक्षा असतांना, चंद्रकांतदादा पाटील यांचे कानडी प्रेमांचे भरते त्यांचा भाषणांवरून आणि गाण्यांवरून स्पष्ट दिसते. चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटनाला हजेरी लावली. मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर, पाटील यांनी भाषणाची सुरुवात ’हुट्टीदरे कन्नड नाडू हुट्टू बेकू’ (जन्माला यायचे तर कर्नाटकात जन्म घ्यावा) या कन्नड गाण्याने करून उपस्थितांना खुश केलं. चंद्रकांत पाटलांनी कन्नड गाण्याची ओळ म्हटल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकात नाराजीचे वातावरण पसरलं आहे. कन्नड गाण्याची ओळ सीमाप्रश्‍नाचे समन्वयक मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. वास्तविक मराठी भाषिक पट्ट्यात कानडी भाषेचे गुणगौरव करणे म्हणजेच मराठी अस्मितेच्या ठिकर्‍या उडवण्याचाच हा प्रकार आहे. चंद्रकांतदादा आपल्या आजवरच्या कारभारात वाद्ग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहिले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे 15 डिसेंबरपूर्वी राज्यातील सर्व खड्डे बुजवू असा महाराष्ट्र भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणार्‍या चंद्रकांत पाटलांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असेच म्हणावे लागेल