सिंधुदुर्ग जि.प. मध्ये होतोय वाहनांचा गैरवापर


सिंधुदुर्गनगरी, दि. 21, जानेवारी - पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाचा अतिरिक्त कारभार सांभाळणारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर यांनी चार गाड्या भाड्याने घेऊन या गाड्यांचा परवानगी घेतल्याशिवाय जिल्ह्याबाहेर आणि राज्याबाहेर वापर केला. या चार गाड्या एकूण 73 वेळा जिल्ह्याबाहेर नेल्या आणि त्यापैकी फक्त 11 वेळाच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची परवानगी घेण्यात आल्याचा खळबळजनक आरोप आरटीआय कार्यकर्ते दयानंद चौधरी यानी केला आहे. याप्रकरणी सुनील रेडकर यांच्या विरुद्ध वारंवार विविध स्तरावर तक्रारी देऊनसुद्धा त्यांच्यावर कारवाई सोडाच पण शासनाकडून साध उत्तर सुद्धा मिळत नसल्याने 26 जानेवारीला उपोषणास बसण्याचा इशारा चौधरी यांनी दिला आहे.जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर यांनी वाहनांचा गैरवापर केल्याचा खळबळजनक आरोप आरटीआय कार्यकर्ते आणि प्रगत सिंधुदुर्गचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी केला आहे. कुडाळ इथ पत्रकार परिषदेत त्यांनी या आरोपांना पुष्टी देणारी माहितीच्या अधिकारातली कागदपत्रच सदर केली.