कुळधरण/प्रतिनिधी/- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने नरशार्दुल राजा संभाजी महानाट्य, खुल्या मॅरेथॉन स्पर्धा तसेच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत येथे १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत दररोज सायंकाळी सहा वाजता दादा पाटील महाविद्यालयासमोर हे महानाट्य होणार असल्याची माहिती समन्वयक ॲड.धनराज राणे-रानमाळ यांनी खेड येथे दिली. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र खुल्या गटात मराठा क्रांती मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक गटासाठी अकरा हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस ठेवण्यात आले. द्वितीय ७०००/-,तृतीय ५०००/- चतुर्थ ३०००/- तर पाचव्या क्रमांकाला २०००/- रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्याच दिवशी साडेअकरा वाजता बक्षीस वितरण होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये बॅंड पथक, गजे नृत्य पथक, लेझिम-ताशा, झांज हलगी आदी पथके सहभागी होणार आहेत. अशी माहिती कर्जत तालुका सकल मराठा समाजचे समन्वयक रवी पाटील, ॲड धनराज राणे-रानमाळ, नानासाहेब धांडे, दिपक भोसले यांनी दिली. काकडे कलेक्शन , जगदंबा मशिनरी आदी ठिकाणाहून महानाट्याची तिकीट विक्री सुरु आहे.
शिवजयंती निमित्त राजा संभाजी महानाट्य, मॅरेथॉन स्पर्धा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:10
Rating: 5