Breaking News

आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा :- वळसे

जामखेड :- केंद्रासह राज्य सरकारने प्रश्‍नांच्या सोडवणूकीवर भर देण्याऐवजी अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांचा गुंता वाढवला आहे. यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या कारभाराविषयी प्रचंड संतापाचे वातावरण आहे. जनतेला आधार देण्याची भूमिका पार पाडावी याकरिता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. समाजात जातीय दूही माजविण्याचे काम काही विघातक शक्ती करत असून सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. यामुळे देशासह राज्यात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


राज्यात 750 मेगावॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प बंद आहेत. कोट्यवधीच्या गप्पा मारणार्‍या जुमलेबाज सरकारला निधीची पुरेशी तरतूद करता येईना. फसव्या घोषणा करून जनतेला मोहात ओढणार्‍या या सरकारला खाली खेचण्याची आता सामान्यांचीच इच्छा आहे. जनतेच्या मनातलं आपलं सरकार यावं, याकरिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गटातटाला विसरून विधानसभा निवडणुकीच्या यशासाठी कामाला लागावे असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिले. जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात वळसे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. जेष्ठ नेते दादा कळमकर, प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, विजयसिंह गोलेकर, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, महिला जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड, बा. स. उपसभापती शारदा भोरे, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, नगरसेवक अमित जाधव, पवन राळेभात, दिगांबर चव्हाण, उमर कूरेशी, नितीन मोहळकर, संजय वराट यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. 

पूढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की कर्जतपेक्षा जामखेडला जास्त गटतट आहेत परंतु पक्ष सक्रिय आहे. तालुक्यातील सर्व पदाधिकारी मातब्बर मंडळी आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत ना. राम शिंदे यांना हरवण्यासाठी आपण सगळे गटतट विसरून एकत्रित पक्षाच्या कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आहिरे, नरेंद्र जाधव यांनी केले तर आभार प्रकाश काळे यांनी मानले