Breaking News

दखल - खासदारांची सेल्फी; मंत्र्यांचा चावटपणा


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तावून सुलाखून निघालेले नेते जबाबदारीनं वागतील, अशी अपेक्षा होती; परंतु तसं होताना दिसत नाही. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना लाच घेताना अटक पकडण्यात आले, तेव्हा संघ परिवाराची प्रतिक्रिया होती, एक स्वयंसेवक नापास झाला; परंतु गेल्या दोन दशकांत घडलेल्या घटनांची उजळणी करायची म्हटलं, तर संघाच्या उत्तीर्ण स्वयंसेवकांपेक्षा नापास स्वयंसेवकांची संख्याच जास्त झालेली दिसेल. प्रश्‍न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप असणार्‍या खासदारांतही भाजपच्याच खासदारांची संख्या जास्त होती. कोणती गोष्ट गांभीयार्न घ्यायची आणि कोणती गोष्ट हसण्यावारी न्यायची, याचं तारतम्यही भाजपच्या नेत्यांना राहिलेलं नाही. 
गिरीश बापट यांच्यासारखा मंत्री तर रोजच भाजपची डोकेदु:खी वाढवायचं काम करतो आहे. कधी पोर्नफिल्म पाहण्याचं समर्थन करीत युवक-युवतींना तुम्हीही ते पाहत असाल, असं निर्लज्जपणे सांगणं असो, की मुलींना बोलवलं, की सुटली पळत असं म्हणणं; भाजपच्या विजया रहाटकर एरवी महिलांच्या बाबतीत काही झालं, की लगेच त्यावर बोलतात. मग, या देठ की हिरवा असलेल्या नेत्याला वारंवार तमाम महिला जगताचा अपमान करूनही जाब का विचारीत नाहीत? असा मंत्री शाळा, महाविद्यालयांत अशी भाषणं करीत असेल, तर सुसंस्कारात संघ परिवार कुठंतरी कमी पडला आहे, असं म्हणावं लागेल. प्रेम, वासना याशिवाय त्यांना काही सुचत नाही का, असा प्रश्‍न यानिमित्तानं उपस्थित होतो. 


अशा मंत्र्यांचा युवक, युवतींनी आदर्श घ्यायचा का? बापट यांची वाचाळ वाणी सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेच. पुण्यात शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात बापट यांचा तोल पुन्हा ढासळला. चल म्हटली की लगेच चालली असं वादग्रस्त वक्तव्य विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत केलं. त्यानंतर गिरीश बापट यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीनं पुण्यातील विविध रस्त्यांवर सैराट बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवा आहे, त्वरित संपर्क साधा, गिरीश बापट यांचं निवासस्थान हा मजकूर असलेले बॅनरच लावले आहेत. 

पुण्यातील एका शाळेत झालेल्या कार्यक्रमात गिरीश बापट म्हटले, स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशात गेले होते, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळं, भाषणामुळं एक युवती प्रभावित झाली. ती सतत त्यांच्या मागं-पुढं करत होती. अखेर ती विवेकानंदांना भेटली आणि लग्न करायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली. आपण लग्न केलं, तर मला तुझ्यासारखा तेजस्वी मुलगा होईल असंही ती युवती स्वामी विवेकानंदांना म्हटली. हे सगळे सांगत असतानाच गिरीश बापट दोन क्षण थांबले आणि म्हटले की तो काळ आत्तासारखा नव्हता, चल म्हटलं की चालली! विद्यार्थिनींना कळलं बघा, शारीरिक आकर्षण नव्हतं असं बापट म्हणाले. 

जिभेवरचा ताबा सुटल्याचा समाचार सोशल मीडियावर नेटकर्‍यांनी घेतलाच. बापट हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी जबाबदारीनं बोलायला हवं. मात्र, ते वारंवार वादग्रस्त वक्तव्यं करीत आहेत त्याचमुळं त्यांना शिकवणीची गरज आहे, म्हणूनच आम्ही हे बॅनर लावलं, असं राष्ट्रवादी काँगे्रसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हटलं आहे. बापट यांच्या राजीनाम्याची मागणी करून त्यांनी तो दिला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही या वेळी देण्यात आला.
भाजपचे चमको खासदार किरीट सोमय्या यांना दुसर्‍या पक्षांतील नेत्यांचा भ्रष्टाचार कुसळासारखा असला, तरी मुसळासारखा दिसतो. त्यावर ते घसा ताणून बोलतात; परंतु स्वपक्षीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे काही आरोप झाले, की मूग गिळून बसतात. मागं मुंबईत चेंगराचेंगरी होऊन 24 जणांचा बळी गेला, तेव्हाही या सोमय्या यांनी चमकोगिरी केली होती. त्यानंतर मात्र त्यांचा खासदार असूनही रेल्वेस्टेशन सुधारणा समितीत समावेश करण्यात आला नव्हता. या सोमय्या यांनाही प्रसंग कोणता आहे, आपण काय करतो, याचं खासदार असूनही गांभीर्य नाही. 

24 जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील दांडियाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते; परंतु हे सोमय्या महाशय एवढ्या भीषण दुर्घटनेनंतरही दांडिया खेळण्यात मश्गुल झाले होते. आताही मुलुंड परिसरात बिबळ्यानं हल्ला केला. त्यात सहा जण जखमी झाले. ही माहिती मिळताच सोमय्या घटनास्थळी हजर झाले. हे चांगलं झालं. जखमींना तातडीनं दवाखान्यात नेऊन उपचार करण्याची व्यवस्था त्यांनी केली असती, तर त्यांचं कौैतुक झालं असतं. 

ज्येष्ठ नेते शरद पवार विदर्भाच्या दौर्‍यावर असताना त्यांनी एक अपघात पाहिला. अपघातामुळं जखमींना गाडीतून काढता येत नव्हतं. पवार यांनी गाडी थांबवून जखमींना गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यांना उपचार मिळतात, की नाही, हे पाहिलं. नंतरच ते पुढं कार्यक्रमासाठी रवाना झाले. वेळ पाळण्याबाबत अतिशय काटेकोर असलेल्या शरद पवारांनी माणुसकी दाखवून केलेली मदत त्या वेळी चर्चेचा विषय झाली होती. सोमय्या यांना मात्र मदतीपेक्षाही सेल्फी महत्त्त्वाची वाटली. त्यांनी पोलीस, जखमी माणसं यांच्यासोबत सेल्फी काढण्यात धन्यता मानली. त्यांच्या या सेल्फी पˆेमाला काय म्हणावं, हा पˆश्‍न रहिवाशांनाही निश्‍चित पडला असेलच. मुलुंड पूर्वेला असलेल्या नानीपाडा भागात बिबळ्या शिरण्याची घटना घडली.

मुलुंड आणि भांडुप पश्‍चिमेचा काही भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भिंतीला लागून आहे. त्या भिंतीवरून अनेकदा वन्यप्राणी लोकवस्तीत शिरतात. आज मुलुंड पूर्व भागात बिबळ्यानं प्रवेश केला आणि सहा जणांना जखमी केलं. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहा जणांवर वीर सावरकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबळ्या लोकवस्तीत शिरल्याची माहिती मिळताच लोकांनी गर्दी केली होती. खासदार किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा चमकोगिरी महागात पडली आहे. सोमय्या यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्वीटमुळे नेटकर्‍यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे. 

या हल्ल्यात जखमी झालेल्या एका व्यक्तीसोबत सोमय्या यांनी सेल्फी काढला आणि टि्वटरवर पोस्ट केला. नानेपाडा येथे लोकांनी दोन वाघ पाहिले. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. मी येथेच आहे, असे ट्वीट सोमय्या यांनी केले, तर पुढच्या ट्वीटमध्ये त्यांनी, सुरेश बाशिदकर जखमी झाले आहेत. नानेपाडा येथे बिबळ्याने त्यांच्यावर हल्ला केला, असं म्हटलं. फोटोमधील व्यक्तीच्या चेहर्‍यावर बिबळ्याच्या हल्ल्याची खूण आणि रक्त स्पष्ट दिसत होतं. या फोटोवर नेटकर्‍यांनी जोरदार टीका केली आहे. जखमी व्यक्तीसोबत फोटो काढण्याऐवजी त्याला वैद्यकीय मदत देण्यासाठी धावपळ करायची होती, असं एका युझरनं म्हटलं आहे. तर एकानं हा हल्ला वाघानं नाही, तर बिबळ्यानं केला आहे. याचाच अर्थ तुम्हाला जंगली जनावरांची माहिती नाही हे दिसतं, असं म्हटलं आहे.