ग्रामीण भागात स्वंयरोजगारासाठी कृती कार्यक्रम : विखे
राहाता तालुक्यात नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार डॉ. धनजंयराव गाडगीळ सभागृहात विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, सभापती हिराबाई कातोरे, व्हाईस चेअरमन पोपटराव लाटे, प्रवरा बॅंकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, उपसभापती बाळासाहेब म्हस्के, मुळा प्रवराचे संचालक देवीचंद तांबे, प्रतापराव तांबे, अशोकराव गाडेकर, ‘गणेश’चे संचालक रावसाहेब शेळके, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कांचन मांढरे आदींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना विखे पाटील म्हणाले की, लोकशाही प्रक्रीयेत मतदारांनी दिलेला कौल आपल्या सर्वांनाच मान्य करावा लागतो. गावपातळीवर या निवडणूकीच्या निमित्ताने मतभेद झाले असतील पण आता मनभेद होवू न देता गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करतानच त्यांनी सांगितले की, सत्तेच्या विक्रेंदीकरणामध्ये आता पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात आधिकार मिळाले आहेत.१३ व्या व १४ व्या वित्त आयोगाचा निधी सामाजिक रचनेप्रमाणे थेट ग्रामपंचायतींना मिळणार असल्याने गावाचा विकास आराखडा तयार करताना नवनिर्वाचीत पदाधिका-यांनी शेवट्याच्या माणसाचा विकास करावा असे त्यांनी सुचित केले.
शासनाच्या माध्यमातून विकासाच्या व वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती ही प्रत्येक सदस्याला असली पाहीजे. आता सर्वच व्यवस्था ऑनलाईन झाल्या आहेत, योजनांची पुस्तीका आपण सर्व सदस्यांना देणार आहोत असे सांगतानाच ना.विखे पाटील म्हणाले की, सामाजिक दायित्वातून सरकारी यंत्रणा अंग काढून घेत आहेत. पण ग्रामपंचायतीवर सामान्य माणूस हा अवलंबून आहे. यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी आता ग्रामपंचायत स्तरावर करुन स्वंय रोजगाराची निर्मिती करण्यासाठी कटीबध्द व्हावे लागणार आहे. गावपातळीवर रोजगाराचा प्रश्न असल्यानेच स्थलांतर होण्याचे प्रमाण अधिक असते यामुळेच स्वंयरोजगाराचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमाचा कृती आराखडा तयार करुन त्याची आंमलबजावणी करणार असल्याचे नमुद करुन, ग्रामपंचायतींमध्ये युवकांबरोबर ५० टक्के महीला निवडून आल्या आहेत. महीला बचत गटांचे कार्य पुढे नेण्याच्या मोठ्या संधी आहेत असे ना.विखे पाटील म्हणाले.
युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूका शांततेत संपन्न झाल्या आता गट-तट विसरुन गावपातळीवर काम करावे लागणार आहे. जातीभेदाला कुठेही थारा न देता माणूसकी हाच धर्म मानुन विकासाचे नियोजन करा असे आवाहन करतानाच आगामी काळात शासकीय योजनांची अंमलबजावणी नियोजनपुर्वक आपण करणार असून, विकासाच्या समान संधी प्रत्येक गावाला कशा मिळतील असे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या मोफत अपघात विमा योजने अंतर्गत या कार्यक्रमात ८ कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपयांचा धनादेश ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. या कार्यक्रमास राहाता तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
