शेतमाल तारण कर्ज योजनेत शंभरावर बाजार समित्यांचा सहभाग - पणनमंत्री सुभाष देशमुख
विशेषत: सुगीच्या काळात बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल दाखल होतो व त्यावेळी त्याचे भाव पडतात, अशा वेळी शेतकऱ्यांच्या मालाला तारण देणारी ही महत्त्वाकांक्षी अशी योजना असून यात उर्वरित बाजार समित्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही मंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे. शेतकऱ्यांनीही कमी भावाच्या काळात या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले आहे.
या योजनेतून तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भरडधान्य आदीला लाभ दिला जातो. शेतकरी कमी भावाच्या काळात ही उत्पादने बाजार समित्यांकडे तारण ठेऊ शकतात. यासाठी त्यांना बाजारसमितीमार्फत मोफत गोदाम उपलब्ध करुन दिले जाते. तसेच फक्त ६ टक्के इतक्या कमी व्याजदरात शेतकऱ्यास शेतमालाच्या त्यावेळी असलेल्या भावाच्या ७५ टक्के रकमेइतके कर्ज लगेच उपलब्ध करुन दिले जाते. त्यानंतर वाढीव भावाच्या काळात शेतकरी आपला माल विकू शकतो व कर्जाची परतफेड करुन वाढीव रक्कम त्याला परत मिळते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोफत गोदाम, गरजेच्या वेळी कर्ज आणि शेतमालास चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. या योजनेत आतापर्यंत १०3 बाजारसमित्यांनी सहभाग घेतला आहे. २०१३ मध्येही संख्या फक्त ३३ इतकी होती. राज्यातील उर्वरित बाजार समित्यांनीही या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे. राज्यात एकूण ३०७ इतक्या बाजार समित्या आहेत.
