Breaking News

तिलारी घाटात अजून एक मृतदेह

सिंधुदुर्गनगरी, दि. 06, जानेवारी - तिलारी घाटात आज पुन्हा एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. घाटात काल आणि आज असे दोन मृतदेह आढळले. दोन्हीही पुरुषांचे आहेत. मात्र अद्याप ओळख पटलेली नाही. दोडामार्ग पोलीस निरीक्षक अशोक पवार पोलीस पथकासह तिलारी घाटात गेले आहेत. दोन्ही मृतदेह जवळजवळच सापडल्याने खळबळ उडाली आहे. चंदगड तालुक्याच्या हद्दीत दोडामार्ग बेळगाव मार्गावर मिळणार्‍या तिलारी घाटात काल (दि.4) पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दगडाच्या कपारीत आढळून आला होता. 


चंदगड पोलिसांनी तो मृतदेह काढून नेला. याबाबत माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु असतानाच आणखी एक मृतदेह त्याच परिसरात असल्याची माहिती चंदगड पोलिसांना मिळाली आणि एकच खळबळ माजली. पोलीस निरीक्षक पवार, पोलीस कर्मचारी शैलेश शिंदे, हनुमंत नाईक, मुसा मुजावर यांच्यासह घटनास्थळावर गेले आहेत. अद्याप मृतदेह चंद्गाडमध्ये आणण्यात आलेला नाही. अथवा त्यांची ओळखही पटलेली नाही, अशी माहिती ठाणे अंमलदार उषा सुतार यांनी दिली. पहिली आंबोली आता तिलारी गेल्या काही महिन्यात आंबोलीत सुद्धा अशाच प्रकारे एकामागोमाग एक असे मृतदेह आढळले होते. 

आंबोलीचा घाट खून करून मृतदेह फेकण्याचा स्पॉट बनल्याची भीती व्यक्त होत असतानाच आता तिलारीच्या घाटातहि दोन मृतदेह आढळल्याने आणखी मृतदेह तर नाहीत ना, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. घातपाताची शक्यता अधिक तिलारी घाटात यापूर्वी अनेक मृतदेह आढळले. यातील बहुतेकांची ओळख पटली होती. खून करून टाकलेल्या त्या मृतदेहामध्ये महिलांचाही समावेश होता. एक तर गरोदर सावत्र आईचा आणि एक केरळीयान महिलेचा होता. आता सापडलेले दोन्ही मृतदेह खून करूनच टाकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कोल्हापूर अथवा बेळगावशी त्यांचे ’कनेक्शन’ असण्याची शक्यता अधिक आहे. सध्या घाट बंद असल्याचा गैरफायदा घेऊन मृतदेह टाकल्याची शक्यता आहे